कोलकात्याचे पोलिस आय़ुक्त आर. के. पाचनंदा यांची अचानक उचलबांगडी केल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तेथील राज्यपाल नाराज झालेत. पश्चिम बंगालचा कारभार हाकण्याची क्षमता तृणमूळ कॉंग्रेसमध्ये खरंच आहे का? याचे उत्तर द्या, असा सवाल राज्यपाल एम. के. नारायणन यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, आयुक्तांना अचानकच का हटविण्यात आले, ते मला समजले नाही. पण गेल्या काही दिवसांमध्ये कोलकात्यात जे घडले, त्यामुळे जर त्यांची उचलबांगडी करण्यात आली असेल, तर या घटनेकडे काळजीपूर्वक बघितले पाहिजे. नक्कीच काहीतरी चुकीचे घडले आहे आणि त्याकडे लक्ष दिलेच पाहिजे.
कोलकात्यात एका पोलिस उपनिरीक्षकाचा खून करण्यात आल्यानंतर याप्रकरणातील आरोपींना तातडीने अटक केली नाही, म्हणून पाचनंदा यांना गुरुवारी आयुक्त पदावरून हटविण्यात आले.
राज्य सरकार आपले काम कार्यक्षमपणे करू शकत नसल्याचे वाटते का, विचारल्यावर नारायणन म्हणाले, आपल्याकडे लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे आणि सरकारकडे पुरेसे बहुमत आहे. आता त्यांनी आपण सरकार चालवू शकतो की नाही, याचे उत्तर दिले पाहिजे. राज्यपाल या प्रश्नांचे उत्तर देऊ शकत नाही.

Story img Loader