Crime News : एका अडीच वर्षांच्या मुलाच्या वक्तव्यामुळे एका गंभीर गुन्हा उघडकीस आल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये समोर आला आहे. स्वत:च्याच लहान मुलाने साक्ष दिल्यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा कानपूरमधील जाजमऊ केडीए कॉलनीतील एका चामड्याचा व्यापार करणाऱ्या व्यक्तीला पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटक केली आहे.
या दाम्पत्याचे २०२० साली लग्न झाले होते. मात्र हा व्यापारी पत्नीच्या कुटुंबियांकडे हुंड्याची मागणी करत असल्याने दोघांमध्ये सतत वाद होत होते. यादरम्यान २९ जानेवारी रोजी महिला तिच्या घरात गंभीरपणे जळालेल्या अवस्थेत आढळली होती, तर व्यापाऱ्याने ही घटना घराला आग लागल्याचा प्रकार असल्याचे सांगून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र अडीच वर्षांचे मुलाला जेव्हा त्याच्या वडिलांकडे जाण्यास सांगण्यात आलं, यावेळी “बाबा मलाही पेटवून देतील”, असं म्हणत त्याने वडिलांकडे जाण्यास नकार दिला.
डास घालवण्याचे कॉइलमुळे घराला लागलेल्या आगीत आपल्याला भाजल्याचे पोलिसांना सांगावे यासाठी महिलेच्या सासरच्यांनी तिच्यावर दबाव टाकला. इतकेच नाही तर असे करण्यास नकार दिल्यास तिला व तिच्या मुलाला इजा पोहचवण्याची धमकी देखील देण्यात आली. सासरच्यांच्या दबावाखाली येऊन महिलेने तसेच पोलीस आणि दंडाधिकाऱ्यांना सांगितले.
रुग्णालयात जळालेल्या महिलेने आता तिच्या सासरच्या लोकांकडून सतत येणाऱ्या धमक्यांवरून तिच्या मुलासाठी संरक्षण मागितले आहे. सासरच्यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेने मुलासाठी संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात तक्रार दाखल केली असून तपास केला जात आहे. दरम्यान महिलेच्या मुलाशी झालेल्या संवादादरम्यान, त्याच्या उत्तराने सर्वांनाच धक्का बसला. लहान मुलाने त्याच्या वडिलांकडे परत जाण्यास नकार दिला. तसेच तो म्हणाला की त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला पेटवून दिले. त्यानंतर पोलिसांनी व्यापाऱ्याला अटक केली आहे.
डीसीपी (पूर्व) श्रवण कुमार सिंह या प्रकरणाबाबत बोलताना म्हणाले की, “या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. आम्ही चौकशी करत आहोत. पुढील कारवाईसाठी पीडितेचा जबाब नोंदवला जाईल.”