Man caught smoking beedi in flight : विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाने चक्क विमानात बीडी पेटवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरूवारी सुरतहून कोलकाता येथे जाणाऱ्या विमानाच्या बाथरूममध्ये हा व्यक्ती धूम्रपान करत होता. या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव अशोक विश्वास असे आहे आणि तो पश्चिम बंगालचा रहिवासी आहे आणि गुजरात मधील नवसारी येथे काम करतो.
आश्चर्याची बाब म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळावर प्रवाशांची कसून तपासणी केली जाते, विमानातील प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतील अशा वस्तू विमानात घेऊन जाण्यास बंधने असतात. तरीदेखील विश्वास हा विमानात बिड्या आणि आगपेटी घेऊन गेला. विमानात तांत्रिक बिघाड आल्याने उड्डाणाला उशिर झाला होता आणि विमान विमानतळावरच असताना एअर हॉस्टेसला बाथरुममधून धूराचा वास आला. तिने तात्काळ विमानतळावरील वरिष्ठांना याबद्दल कळवले, त्यानंतर विमानात तपासणी करण्यात आली.
तपासणी केल्यावर विश्वासच्या बॅगेत बीडी आणि एक कडीपेटी आढळून आली, त्यानंतर त्याला विमानातून बाहेर काढण्यात आले. एअरलाइनने या घटनेची तक्रार डुमस पोलिसांकडे केली त्यानंतर या प्रवाशाला अटक केली.
पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाचे उड्डाण दुपारी ४.३५ वाजता होणार होते. पण तांत्रिक कारणामुळे त्याला उशीर झाला. जवळपास सायंकाळी ५.३० वाजता एअर हॉस्टेसला धूराचा वास आला आणि तिने वरिष्ठांना याबद्दल माहिती दिली. अधिक तपास केल्यानंतर १५ए सीटवर बसलेला प्रवासी विश्वास याच्याकडे बंदी असलेल्या वस्तू आढळून आल्या.
पोलिसांनी या प्रकरणी प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याने बीएनएसच्या कलम १२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एअरलाइनने याबद्दल अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. पण विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी औपचारिक तक्रार दाखल केली आहे.