Lover Extorted 2.5 Crore From Girlfriend : बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २२ वर्षीय तरुणाने खासगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत २० वर्षांच्या तरुणीकडून २.५ कोटी रुपये उकळले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी पीडितेचा प्रियकर होता. त्यांच्यातील नाते तुटल्यानंतर आरोपीने हा प्रकार सुरू केला.
काय आहे नेमकं प्रकरण?
आरोपी आणि पीडितेचे शिक्षण एकत्र झाले आहे. त्यानंतर त्यांच्यातील संपर्क तुटला होता. मात्र, काही काळाने ते पुन्हा संपर्कात आले होते. आरोपीने पीडितेला लग्नाचे आश्वासन देत फिरायला नेले होते. त्यावेळी आरोपीने प्रेयसीचे काही फोटो आणि व्हिडिओ काढले. यानंतर काही दिवसांनी आरोपीने प्रेयसीला ब्लॅकमेल करत पैसे मागायला सुरुवात केली. आरोपीच्या धमक्यांमुळे प्रेयसीने गेल्या काही महिन्यांमध्ये २.५७ कोटी रुपये पाठवले आहेत. पीडित तरुणीने सुरुवातीला तिच्या आजीच्या बँक खात्यातून १.२५ कोटी रुपये पाठवले होते. त्यानंतर तिने आरोपीला वेळोवेळी १.३२ कोटी रुपये रोखीने दिले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
८० लाख रुपये जप्त
दरम्यान आरोपीच्या मागण्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या. या सर्व प्रकाराला कंटाळून पीडित प्रेयसीने बंगळुरू पोलिसांमध्ये प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याकडील ८० लाख रुपये जप्त केले. पीडितेकडून दोन कोटींहून अधिक रक्कम उकळ्यानंतरही आरोपीची हाव संपत नव्हती. त्याने पुढे पीडितेकडे महागडी घड्याळे, सोन्याचे दागिणे, लक्झरी मोटारी मागायला सुरुवात केली होती.
पीडित तरुणी आणि आरोपी बीबीएचे शिक्षण घेताना एकाच वर्गात होते. २०१९ ते २०२२ या कालावधीत पीडितेने शिक्षण पूर्ण केले. तर आरोपीने द्वितीय वर्षात कॉलेज सोडून दिले होते. २०२३ मध्ये पुन्हा पीडितेच्या संपर्कात आल्यानंतर आरोपीने तिच्याकडून पैसे उकळायला सुरुवात केली.
काय म्हणाले पोलीस?
या सर्व प्रकरणावर बोलताना बंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद म्हणाले की, “प्रियकराकडून अर्थिक लूट होत असल्याची तक्रार पीडितेने दाखल केली होती. आरोपीने आतापर्यंत पीडितेकडून २.५७ कोटी रुपये उकळले आहेत. आरोपीला आम्ही अटक केली असून, त्याच्याकडील ८० लाख रुपये जप्त केले आहेत.”