पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तीचं नाव शेख नूर आलम आहे. त्याच्याकडून एक बंदूक, एक चाकू आणि विविध यंत्रणांची अनेक ओळखपत्र जप्त करण्यात आली आहेत. ‘पोलीस’ असं स्टिकर असलेल्या कारमधून तो प्रवास करत होता. अटक केलेल्या शेख नूर आमलची पोलीस, एसटीएफ आणि विशेष शाखा चौकशी करत आहे.

“हरीश चॅटर्जी रस्त्यावरील बॅनर्जी यांच्या निवासस्थानी ‘पोलिस’ स्टिकर असलेली काळी कार आली होती. चालकाने काळा कोट परिधान केला होता आणि नाका तपासणीदरम्यान त्याला पकडण्यात आले”, असे पोलिसांनी सांगितले. “अटक केलेल्या व्यक्तीला ममता बॅनर्जींना भेटायचे होते, असा त्याने दावा केला. परंतु, त्याचा नेमका उद्देश काय होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न कोलकत्ता पोलीस करत आहेत”, अशी माहिती कोलकता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी दिली.

विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी या घटनेबद्दल कोलकाता पोलीस आयुक्त आणि कालीघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. “हे पोलिसांचे काम आहे. त्यांनी व्हीआयपींची कडेकोट सुरक्षा सुनिश्चित करावी. अशा घटना रोखणे हे त्यांचे काम आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील या त्रुटीबद्दल मी कोलकाता पोलिस आयुक्त आणि कालीघाट पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी करतो,” सुवेंदू अधिकारी म्हणाले.

Story img Loader