Muthyalamma temple of Secunderabad vandalised: तेलंगणा राज्यातील सिंकदराबाद येथे असलेल्या मुथ्यालम्मा मंदिरात तोडफोड केल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. आता याप्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील ३० वर्षीय संगणक अभियंता सलमान सलीम ठाकूर याला पोलिसांनी अटक केली आहे. सलमान मुस्लीम धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईकचे व्हिडीओ पाहून प्रभावाखाली आला होता, ज्यामुळे एका विशिष्ट समाजाविरोधात त्याच्यात द्वेषाची भावना निर्माण झाली होती, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. संगणक अभियंता असलेला सलमान सोशल मीडियावर सक्रिय होता. फेसबुक आणि युट्यूबवर मुस्लीम धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक आणि इतरांचे व्हिडीओ तो सतत पाहत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

सिंकदराबादच्या उत्तर विभागाचे पोलीस उपायुक्त रश्मी पेरुमल म्हणाल्या की, झाकीर नाईक यांचे व्हिडीओ पाहून सलमानच्या डोक्यात एका धर्माविरोधात द्वेष निर्माण झाला होता. याआधीही त्याने अशाप्रकारचे कृत्य केल्याचे मान्य केले आहे. वसई-विरार (ऑगस्ट २०२४) आणि मुंबई (सप्टेंबर २०२४) येथेही त्याने मंदिरात नासधूस केली होती.

हे वाचा >> Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण: शुभम लोणकर अजूनही सापडेना; लुकआऊट नोटीस जारी!

सलमान ठाकूर ऑक्टोबर महिन्यात सिंकदराबाद येथे आला होता. मोटिव्हेशनल स्पिकर मुन्नवर झमा यांच्या एका महिन्याच्या व्यक्तिमत्व विकास शिबिरात सहभाग घेण्यासाठी तो याठिकाणी आला होता. त्याच्यासह त्याचे काही मित्रही होते. रेजिमेंटल बाजारातील एका हॉटेलमध्ये हे सर्व लोक वास्तव्यास होते. झमा हे इंग्लीश हाऊस अकादमीचे मालक आहेत. पोलीस उपायुक्त रश्मी पेरुमल यांनी सांगितले की, सदर हॉटेल परिसरात अनधिकृतरित्या हा कोर्स सुरू होता.

मुळचा मुंब्रा येथे राहणारा सलमान ठाकूर याने मुंबई परिसरातही मंदिराचे पावित्र्य भंग केल्याचे मान्य केले आहे. २०२२ साली गणपती मंडपात बुट घालून येणे आणि मूर्तीसमोर आक्षेपार्ह वर्तन करणे, याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. वसई-विरार येथील भगवान शंकराच्या मंदिरात नाशधूस केल्याप्रकरणीही त्याला अटक करण्यात आली होती.

कधी घडली घटना?

१४ ऑक्टोबर रोजी सिंकदराबादच्या मुथ्यालम्मा मंदिरात काही जणांनी तोडफोड केली. तसेच मूर्तीची विटंबना करण्यात आली. यानंतर स्थानिक परिसरात तणाव निर्माण झाला होता. अनेक लोक मंदिर परिसरात जमू लागले होते. यावेळी त्यांनी आपला राग व्यक्त केला. तसेच काही स्थानिकांनी पळून जाणाऱ्या सलमान ठाकूरला पकडले आणि मारहाण केली. यानंतर पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतले आणि मंदिर परिसरात शांतता कायम राखण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात केला.

तेलंगणाचे माजी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री केसीआर यांचे चिरंजीव केटीआर यांनी या घटनेबद्दल एक्सवर पोस्ट करून नाराजी व्यक्त केली होती. अशा निदंनीय घटनामुळे सिंकदराबाद सारख्या सहिष्णू शहराला तडा जात आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. तसेच राज्य सरकारने संबंधित गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करतो.