Crime News : पत्नीला मुलगी झाली म्हणून पतीने तिच्यावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला आहे. महिलेच्या कुटुंबाने हा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करुन आरोपीला अटक केली आहे. हरिजिंदर कौर असं या महिलेचं नाव आहे. तिच्या डोक्याला मार लागला आहे आणि शरीरावर जखमा झाल्या आहेत. उत्तराखंड येथील ही घटना आहे.

नेमकी काय घटना घडली?

उत्तराखंडमधल्या काशीपूर या ठिकाणी राहणाऱ्या हरजिंदर कौरने असा आरोप केला आहे की तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी तिच्या कुटुंबाकडे पाच लाख रुपये रोख आणि सोनं हुंडा म्हणून मागितलं. तसंच जेव्हा हरजिंदरने मुलीला जन्म दिला तेव्हा तिच्या पतीने तिच्यावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला आणि तिला जखमी केलं. या संदर्भातला व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तो माणूसच्या त्याच्या पत्नीचे केस ओढून तिला जमिनीवर ओढतो आहे. काही लोक हरजिंदरला वाचवताना दिसत आहेत. पण आरोपीने हातात स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केल्याचं दिसून येतं. तसंच तिच्या कपड्यांवरही रक्ताचे डाग दिसत आहेत. ती ओरडते आहे आणि तिला जखमा झाल्याचंही दिसतं आहे. या माणसाने हरजिंदरला वाचवण्यासाठी येणाऱ्यांनाही जखमी करण्याच्या धमक्या दिल्याचं व्हिडीओत दिसतं आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी हरजिंदरच्या पतीला अटक केली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात हरजिंदरला मानेवर, तिच्या उजव्या कानाजवळ आणि इतर काही भागांत जखमा झाल्या आहेत. हरजिंदरच्या आईने हा आरोप केला आहे की तिचा पती आणि सासरचे लोक हे तिला पाच लाख रुपये आणि सोनं मागत होते. तसंच त्यांना कुटुंबाचा वारस म्हणून मुलगा हवा होता. मुलगी झाल्याने हरजिंदरच्या पतीने तिच्यावर हल्ला केला. तु्म्ही हरजिंदरच्या नवऱ्याला आणि त्याच्या घरातल्यांना कठोर शिक्षा करा अशी मागणी हरजिंदरच्या आईने पोलिसांकडे केली आहे. तसंच घडलेल्या घटनेमुळे तिचे कुटुंबीय हादरून गेले आहेत. या प्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी हरजिंदरच्या कुटुंबाने केली.

मला ठार करण्याचा प्रयत्न झाला-हरजिंदर कौर

हरजिंदरने तिच्या पतीवर आणि तिच्या सासरच्या लोकांवर हा आरोप केला आहे की त्यांनी तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी हरजिंदरच्या पतीला अटक केली आहे. आम्ही या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.