मध्य प्रदेशातील राजगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका तरुणानं टोल प्लाझावर काम करणाऱ्या महिलेस मारहाण केली आहे. पीडित महिलेनं आरोपीकडे टोलची मागणी केली होती. पण आरोपीनं आपण स्थानिक असल्याचं सांगून महिला कर्मचाऱ्याशी वाद घालायला सुरुवात केली. यानंतर त्यानं टोल कर्मचारी महिलेस शिवीगाळ करत मारहाण केली आहे.

मारहाण केल्याची घटना टोल प्लाझावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. याप्रकरणी राजगढ पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

हेही वाचा- कल्याण : पोलीस वाहनात बसून गुन्हेगाराने वाढदिवसाचा केक कापल्याने खळबळ

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीनं टोल देण्यास नकार देत टोल प्लाझावरील महिला कर्मचाऱ्याशी वाद घालायला सुरुवात केली होती. आपण स्थानिक असल्यामुळे टोल देणार नाही, असा हट्ट आरोपीनं धरला होता. हा वाद वाढत गेल्यानंतर पीडित महिलेनं टोल प्लाझावरील व्यवस्थापकाला बोलावलं. पण संतापलेल्या आरोपीनं पीडित महिलेला शिवीगाळ करत कानशिलात लगावली.

ही सर्व घटना टोल प्लाझावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी राजगढ पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकारी रामकुमार रघुवंशी यांनी दिली.

Story img Loader