पंजाबमधील अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरातील (Golden Temple) धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरु ग्रंथ साहिब यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाने मारहाण करत ठार केलं आहे. पोलिसांनी हत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे. घटनेनंतर सुवर्ण मंदिर परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहरास साहिब पाठ सुरु (संध्याकाळची प्रार्थना) असताना एका अज्ञात व्यक्तीने रेलिंगवरुन उडी मारली आणि कथितपणे गुरु ग्रंथ साहिब यांच्यासमोर ठेवलेल्या तलवारीला हात लावत अपवित्र काम करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तेथील जमावाने तरुणाला बाहेर नेलं आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. पंजाबच्या गृहमंत्र्यांनीही याला दुजोरा दिला आहे.
अमृतसर शहराचे डीजीपी (कायदा आणि सुव्यवस्था) परमिंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “एका २४-२५ वर्षीय तरुणाने पवित्र पुस्तक (गुरु ग्रंथ साहिब) ठेवण्यात आलेल्या ठिकाणी घुसखोरी केली. त्याने तलवारीच्या सहाय्याने अपवित्र काम करण्याचा प्रयत्न केला. त्याला जमावाने पकडून बाहेर नेलं असता बाचाबाची झाली आणि त्यानंतर झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला”.
तरुणाचा मृतदहे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान तरुण एकटाच होता असं वाटत असून प्रकरणाचा तपास सुरु आहे अशी माहिती परमिंदर सिंग यांनी दिली आहे.
घटनेचा व्हिडीओ –
भाजपा नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी यामागे कट असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बातचीत केली आहे. त्यांनी योग्य तपास करण्याचं आश्वासन दिलं आहे.
मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनीदेखील ही घटना खेदजनक असून निषेध व्यक्त केला आहे. तसंच याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.