अगदी क्षुल्लक कारणावरून झालेले वाद पुढे भांडण, हाणामारी आणि हिंसक वळण घेत असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. अशीच एक घटना हैदराबादमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. बिर्याणीवर जास्त रायता मागितल्यावरून झालेला वाद पुढे हाणामारी आणि शेवटी ग्राहकाचा जीव जाण्यापर्यंत पोहोचल्याची घटना घडली आहे. ३२ वर्षीय ग्राहकाचं नाव लियाकत असून हैदराबादच्या पंजागट्टा भागातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
रविवारी रात्री लियाकत आपल्या मित्रांसोबत या हॉटेलमध्ये जेवणासाठी आला होता. हे हॉटेल बिर्याणीसाठी प्रसिद्ध असल्याचं सांगितलं जातं. या मित्रमंडळींनीही बिर्याणीचीच ऑर्डर दिली होती. बिर्याणीबरोबर आणखी रायता द्यावा, अशी मागणी लियाकतच्या मित्रांनी केली. या मुद्द्यावरून त्यांचा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी वाद सुरू झाला. वादावादी इतकी विकोपाला गेली की हे प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचलं.
IRS ऑफिसर कसा बनला कर्करोगग्रस्त पत्नीचा खुनी? दिल्लीत महिला वकिलाच्या हत्येच्या दिवशी काय घडलं?
आधी लियाकत व त्याच्या मित्रांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर रागाच्या भरात हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही लियाकत व त्याच्या मित्रांना बेदम चोप दिला. दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचं हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून येत आहे. प्रकरण शांत होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर दोन्ही बाजूंनी थेट पोलीस स्थानक गाठलं!
पोलीस स्टेशनमध्येच लियाकत कोसळला
दरम्यान, पोलीस स्थानकात एकमेकांवर आरोप व तक्रारी करत असतानाच लियाकतला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच, छातीतही दुखू लागल्याची तक्रार लियाकतनं केली. मात्र, पुढच्या काही मिनिटांतच लियाकत जमिनीवर कोसळला. लियाकतला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिथे त्याला मृत घोषित केलं.
लियाकतचा मृतदेह तातडीने पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूचं कारण त्यानंतर कळू शकेल. मात्र, मारहाणीच्या घटनेमुळे लियाकतला हृदयविकाराचा झटका बसला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.