एक ५० वर्षीय मुस्लीम व्यक्ती आणि त्याचे कुटुंबीय घरात गोमांसाचा साठा करून त्याचे सेवन करतात, अशी अफवा पसरल्याने बिसारा गावातील नागरिकांनी त्या व्यक्तीला केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची, तर त्याचा २२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील दादरी येथे घडली.
बिसारा गावात राहणाऱया मोहम्मद अखलाख(५०) याने घरात गोमांसाचा साठा करून ठेवल्याची माहिती परिसरात पसरताच गावकऱयांनी सोमवारी रात्री त्याच्या घरावर हल्ला केला. घरात मांसाचा साठा देखील आढळून आल्याने गावकऱयांनी संतप्त होऊन मोहम्मद यांस बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला तर, मुलगा दानिश गंभीररित्या जखमी झाला. त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यामुळे जोरदार निदर्शने करण्यात आली. निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात वेल्डिंगचे काम करणारा एक २० वर्षांचा युवक जखमी झाला. ही अफवा पसरविणाऱ्या मंदिरातील पुजाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, अखलाख याच्या घरातील शितपेटीत मिळालेले मांस पोलिसांनी न्यायवैद्यकीय तापसणीसाठी पाठवले आहे. तर, शितपेटीत आम्ही गोमांस नाही तर, मटण ठेवले होते, असे मोहम्मद अखलाख यांची मुलगी साजिदा हिने पोलिसांना सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा