पत्नीशी झालेल्या वादातून एका ६० वर्षांच्या माणसाने त्याच्या पत्नीचं शीर धडावेगळं केलं आणि ते सायकलवर घेऊन तो पोलीस ठाण्यात पोहचला. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या ६० वर्षीय माणसाला अटक केली आहे. गुवाहाटी येथील चिराग जिल्ह्यात ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली.

नेमकी घटना काय घडली?

६० वर्षीय माणसाचा त्याच्या पत्नीशी वाद झाला. त्याने धारदार शस्त्राने त्याच्या पत्नीची हत्या केली. तिचं शीर धडावेगळं केलं. त्यानंतर एका बास्केटमध्ये ते शीर ठेवलं आणि ते घेऊन हा माणूस पोलीस ठाण्यात आला.त्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. सायकलवर आणि बास्केटमध्ये रक्ताचे डागही पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या माणसाच्या पत्नीचं शीर ताब्यात घेतलं आहे. ६० वर्षीय हा माणूस रोजंदरीवर काम करतो. घरगुती कारणावरुन या दोघांचा वाद झाला. ज्यानंतर या माणसाने त्याच्या पत्नीचं शीर धडावेगळं केलं.

ब्रिटिश हाजोंगला पोलिसांनी केली अटक

ब्रिटिश हाजोंग असं या माणसाचं नाव आहे. त्याच्या शेजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटिश हाजोंग शनिवारी रात्री काम संपवून घरी आला. त्यानंतर त्याचं आणि त्याच्या पत्नीचं भांडण झालं. या दोघांचं भांडण रोज होत असे. शनिवारी या दोघांचं भांडण झालं त्यानंतर ब्रिटिशने त्याच्या बायकोला ठार मारलं आणि तिचं शीर धडावेगळं केलं. ते घेऊन त्याने पोलीस ठाणं गाठलं.

पोलिसांनी महिलेचा मृतदेह घेतला ताब्यात

पोलिसांनी या महिलेचं शीर आणि तिचा मृतदेह दोन्ही ताब्यात घेतलं आहे आणि तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आम्ही ब्रिटिशची या प्रकरणी चौकशी करत आहोत असं पोलिसांनी सांगितलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.