Man Booked For Rape On Pretext Of Marriage: बलात्काराच्या आरोपीला जामीन मंजूर करताना दिल्ली उच्च न्यायालयाने एक मोठे विधान केले आहे. तक्रारदार व आरोपीची भेट ही डेटिंग ऍपद्वारे झाली होती, लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर नाही, त्यामुळे लग्न करणे ही जबाबदारी, वचन किंवा आश्वासन ठरवता येणार नाही. न्यायमूर्ती विकास महाजन यांनी आरोपीला जामीन मंजूर करताना असे म्हटले की, तक्रारदार महिला व आरोपी ‘Hinge’ या डेटिंग अॅपवर भेटले होते, मॅट्रिमोनिअल अॅपवर नाही शिवाय त्यांच्यामध्ये झालेल्या मेसेजवरील संभाषणात सुद्धा त्याने लग्नाचा कोणताही प्रस्ताव ठेवल्याचे दिसून आले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं प्रकरण काय?

भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ३७६ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एका प्रकरणात जामीन मागणाऱ्या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होत असताना या प्रकरणाचा सविस्तर उलगडा झाला होता. प्राप्त माहितीनुसार, याचिकाकर्ते आणि तक्रारदार Hinge वर एकमेकांना भेटले आणि प्रेमात पडले होते. जामिनासाठी याचिका करणाऱ्या आरोपीने सुरुवातीला आयआयटी खडगपूरमधून अभियांत्रिकी पदवी, यूके आणि न्यूझीलंडमधून डबल मास्टर्स आणि लंडनच्या किंग्स कॉलेजमधून पीएचडी असल्याचा दावा केला होता, नंतर तो फक्त बीएससी पदवीधर असल्याचे उघड झाले होते

याशिवाय, तक्रारदार महिलेने दावा केला होता की तिने याचिकाकर्त्याला त्याच्या वैद्यकीय उपचारासाठी सुमारे १.२ कोटी रुपये दिले आहेत. याबाबत न्यायालयाच्या निरीक्षणात समोर आले की, जानेवारी २०२१ मध्ये आरोपीला महिलेने २५,००० रुपये दिले होते जे परत मिळाले नसतानाही ती महिला त्याला मोठ्या प्रमाणात पैसे देत राहिली.

कोर्टाने काय निर्णय दिला?

कोर्टाने असे नमूद केले की तक्रारदार महिलेने यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, आरोपीने त्याच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल खोटी माहिती दिली होती याचा खुलासा झाल्यावरही ते दोघे चार दिवस एअरबीएनबीमध्ये एकत्र होते आणि तेव्हा त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध सुद्धा प्रस्थापित झाले होते.

FSL द्वारे दाखल केलेल्या याचिकेत तक्रारदार महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ आरोपीच्या फोनमध्ये असण्याबाबत सुद्धा उल्लेख होता. याबाबत निर्णय देताना कोर्टाने असे सांगितले की, महिलेने स्वतः तिच्या उलटतपासणीत कबूल केले आहे की असे फोटो आणि व्हिडिओ तिच्या संमतीने घेतले होते. उपरोक्त वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर, प्रथमदर्शनी, शारीरिक संबंध सहमतीने झाल्याचे दिसते तसेच लग्नाचे कोणतेही खोटे आश्वासन देऊन हे संबंध ठेवण्यात आल्याचे सुद्धा पुरावे नाहीत.

हे ही वाचा<<“त्याने नको तसा स्पर्श केला मग मी त्याला..”, अँकरकडून धनुषच्या चाहत्याला चोप; हाणामारीच्या Video वर दिलं उत्तर

प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थितीचा एकंदरीत विचार करता, याचिकाकर्त्याने नियमित जामीन मंजूर करण्यासाठी केस तयार केली आहे. त्यानुसार, याचिकाकर्त्याने २५,००० च्या रकमेचा वैयक्तिक बाँड आणि तेवढ्याच रकमेचा एक जामीन बाँड भरल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

याचिकाकर्त्यातर्फे अधिवक्ता एलएस चौधरी आणि करणवीर सिंग यांनी बाजू मांडली. राज्याची बाजू अतिरिक्त सरकारी वकील हेमंत मेहला यांनी मांडली. तक्रारदार महिलेच्या वतीने वैभव दुबे, प्रद्युम्न कैस्थ आणि शुभम जैन हे वकील हजर होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man booked for rape on promise of marriage delhi hc grants bail saying you met on hinge dating app no matrimony site svs
Show comments