भारतीय-अमेरिकी कादंबरीकार झुंपा लाहिरी यांचा मॅन बुकर पारितोषिकाचा मान हुकला असून न्यूझीलंडच्या एलेनॉर कॅटन या अवघ्या २८ वर्षांच्या लेखिकेने या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. कॅटन यांना जाहीर झालेला बुकर पुरस्कार पन्नास हजार पौंडाचा असून तो त्यांच्या ‘द ल्युमिनरीज’ या ८३२ पानांच्या कादंबरीस मिळाला आहे. एकोणिसाव्या शतकातील एका खुनाच्या रहस्यकथेवर ही कादंबरी बेतली आहे. त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार डचेस ऑफ कॉर्नवॉल कॅमिला पार्कर बॉवेल्स यांच्या हस्ते लंडनमधील गिल्डहॉल येथे शानदार समारंभात प्रदान करण्यात आला.  
 ‘द ल्युमिनरीज’ ही कादंबरी मोठी असली तरी चमकदार आहे,  मोठी जरूर आहे, पण अस्ताव्यस्त नाही. किचकट आहे, पण चिकित्सक नाही, ही प्रायोगिक कादंबरी आहे पण पारंपरिक कथाकथन मूल्यांना कुठेही धक्का लावलेला नाही, असे  निवड समितीचे प्रमुख राबॅर्ट मॅकफरलेन यांनी सांगितले.
एलेनॉर कॅटन यांच्या प्रतिस्पर्धी झुंपा लाहिरी यांची ‘द लोलँड’ ही कादंबरी स्पर्धेत होती, ती कोलकात्यात १९६० च्या सुमारास वाढलेल्या दोन भावांची कथा आहे, धरणीकंपासारखे हादरे देणारी ही कादंबरी अतिशय सुबोध व दोषरहित आहे असे परीक्षकांनी सांगितले.
यंदा मॅन बुकरच्या स्पर्धेत कॅनडा, ब्रिटन, आर्यलड, न्यूझीलंड या देशांचे लेखक होते व इतिहासात प्रथमच झिंबाब्वेच्याही एका लेखकाचे नामांकन होते. कोम टायबिन यांची द टेस्टॅमेंट ऑफ मेरी ही कादंबरी जिझसला क्रूसावर दिल्यानंतर त्याच्या आईने केलेल्या आक्रोशाची शंभर पानी कहाणी आहे, ती स्पर्धेतील सर्वात लहान कादंबरी ठरली.  मॅन बुकर पुरस्काराचे हे ४५ वे वर्ष होते व गेल्या वर्षी तो हिलरी मँटल यांना ब्रिंग अप द बॉडीज या पुस्तकासाठी मिळाला होता. दोनदा हा पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या महिला व पहिल्या ब्रिटिश लेखिका ठरल्या होत्या.
‘‘मॅन बुकर पुरस्कार दिल्याबद्दल,  लेखन गुणांचे चांगले मूल्यमापन केल्याबद्दल मी आभारी आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षी  ही कादंबरी लिहायला घेतली होती, त्याचा आता सन्मान होताना बघून आनंद वाटला!’’ – एलेनॉर कॅटन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man booker prize eleanor catton becomes youngest winner
Show comments