मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रसंग घडला आहे. या प्रसंगानंतर मध्य प्रदेशमधील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात एका माथेफिरूने कुत्र्याच्या छोट्याशा पिल्लाला उचलून आपटले आणि नंतर पायाने तुडवून त्याला अमानुषपणे मारले. सदर घटनेचे सीसीटीव्ही चित्रण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळीकडूनच संताप आणि हळहळ व्यक्त करण्यात आली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून ओरोपीवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सदर आरोपीला अटक केल्याचे जाहीर केले.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, सदर घटना शनिवार, दि. ९ डिसेंबर रोजी घडली. सीसीटीव्ही चित्रण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या क्रूर घटनेची थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला, त्यांचे हृदय पिळवटून निघावे, इतके क्रौर्य माथेफिरू आरोपीने दाखविले आहे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव मृत्यूंजय जदाऊ असे असून तो गुनामधील राधापूर कॉलनीतील रहिवासी आहे. खाली पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये झालेला प्रकार स्पष्ट दिसत आहे. आरोपी रस्त्यालगत एका दुकानाच्या कठड्यावर बसला असताना दोन कुत्र्याची पिल्लं त्याच्याकडून येऊन खेळू लागतात. निरागस असलेल्या या पिल्लांशी कुणीही लाडीगोडी लावत खेळण्याचा प्रयत्न करेल. पण माथेफिरू आरोपीने त्यातील एका पिल्लाला हाताने वर उचलून रस्त्यावर फेकून दिले. एवढ्यावरच न थांबता तो जागेवरून उठला आणि रस्त्यावर पडलेल्या पिल्लाचा पायाने चेंदा केला.

तळपायाची आग मस्तकात जाणारा सदर प्रकार पाहून कुणालाही संताप येऊ शकतो. या घटनेची अधिक माहिती समोर आल्यानंतर कळले की, आरोपी मानसिक रुग्ण आहे. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिकांनीही याला दुजोरा दिला असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.

रानटी कृत्यावर कठोर कारवाई करा

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी या प्रकारावर सर्वात आधी आवाज उठवला. “अतिशय क्रूर आणि अस्वस्थ करणारा हा व्हिडिओ असून या रानटीपणावर कडक कारवाई झाली पाहीजे, याबाबत कोणताही संशय मला वाटत नाही”, असे मत त्यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर व्यक्त केले.

मध्य प्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री शिवराज चव्हान यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला. “गुना जिल्ह्यातून समोर आलेली पशू क्रुरतेची घटना अतिशय विदारक आहे. याप्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतले आहे. रानटीपणाची ही कृती अक्षम्य अशी आहे. सदर आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करेल.”

Story img Loader