प्रेयसीशी त्याने लग्न केलं. त्यानंतर ती त्याची पत्नी झाली. मात्र त्याने तिला जी शिक्षा दिली ती ऐकून तुमचं काळीज पिळवटल्याशिवाय राहणार नाही. पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर टाइल कटरने पत्नीच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले. हे तुकडे पतीने पॉलिथिनमध्ये भरून ठेवले होते. सती असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर पवन सिंह हे तिच्या पतीचं नाव आहे. छत्तीसगढच्या विलासपूरमध्ये ही घटना घडली आहे. पवन सिंह आणि सती या दोघांचं लग्न दहा वर्षांपूर्वी झालं होतं.
नेमकी काय घडली घटना?
पवन आणि सती या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या दहा वर्षांनंतर पवनला संशय येऊ लागला होता की सतीचे कुठल्याश्या युवकाशी अनैतिक संबंध आहेत. त्यामुळे तो सतीला मारहाण करत होता. १५ दिवसांपूर्वी राजकुमार साहू हा मावशी सतीला भेटायला आला होता. त्यावेळी सती घरी नव्हती. त्यामुळे पवन सिंहला त्याने मावशी कुठे आहे असं विचारलं. त्यावर पवनने सांगितलं की तुझी मावशी कुठल्या तरी मुलासोबत पळून गेली.
सतीच्या कुटुंबाला पवन जे सांगत होता ते त्यांना खटकत होतं. त्यामुळे सतीच्या कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांना सती आणि पवनमध्ये कसे खटके उडत होते हेदेखील सतीच्या नातेवाईकांनी सांगितलं. तसंच सतीला पवन मारहाण करत होता हेदेखील सांगितलं. सतीनेही आपला पती आपल्याला मारहाण करतो अशी तक्रार पोलिसात केली होती. त्यामुळे पोलिसांचा पहिला संशय सतीच्या पतीवर होता.
पोलिसांनी ५ मार्चला पवन सिंहला अटक केली. पवनच्या घरात खोट्या नोटा छापण्याचं मशीन होतं. त्यामुळेच त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी जेव्हा घराची झडती घेतली तेव्हा त्यांना पाण्याच्या टाकीत पॉलिथिनच्या सहा बॅगा आणि त्यात सतीच्या मृतदेहाचे सहा तुकडे सापडले. त्यानंतर पवनला पोलिसांनी अटक केली. पवनला अटक केल्यानंतर त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत पवनने त्याचा गुन्हा कबूल केला. सतीचे दुसऱ्या पुरूषाशी अनैतिक संबंध आहेत या संशयावरून आपण तिला ठार केल्याचं पवनने सांगितलं आहे.
हत्येनंतर पवनने काय केलं?
पत्नी सतीची हत्या केल्यानंतर पवनने टाइल कटर आणलं.त्या टाइल कटरने पत्नीच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले. सुरूवातीला त्याने मृतदेहाचे हात कापले त्यानंतर पाय कापले. त्यानंतर शीर धडावेगळं केलं. या मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून पॉलिथिनमध्ये हे सहा तुकडे पॅक केले आणि त्याला वरून टेप लावला. या सगळ्या पॉलिथीन पाण्याच्या टाकीत ठेवल्या.
पवनने ऑनलाइन नोटा छापण्याची ट्रेनिंग घेतली होती. त्यामुळे त्याच्या घरात नोटा छापण्याचं मशीन होतं. पवनला सतीच्या प्रेताचे सहा तुकडे बाहेर फेकायचे होते. पण त्याच्या बिल्डिंगमध्ये काम सुरू होतं त्यामुळे तो ते तुकडे घेऊन बाहेर जाऊ शकला नाही. पोलिसांनी बनावट नोटांच्या केसमध्ये पवनला अटक केली त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा पोलिसांना मृतदेहाचे सहा तुकडेही आढळले.