Lawrence Bishnoi Latest News: मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला आहे. सध्या गुजरातमधील तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईची गँग बाहेर मात्र अनेक कारवाया करताना दिसत आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारीही बिश्नोई गँगनं घेतल्यानंतर अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एकीक़डे बिश्नोई गँगच्या कारवाया वाढत असताना दुसरीकडे गँगच्या नावाने वैयक्तिक स्वार्थ साधण्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत.

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून एक घटना नुकतीच उघड झाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून एका जावयानं थेट लॉरेन्स बिश्नोई गँगकडून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार पोलिसांत केली. पोलिसांनी सविस्तर तपास केल्यानंतर त्यांना सत्य समजलं आणि पोलीसही चक्रावले! टाइम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

नेमकं घडलं काय?

कानपूरमधील देबियापूर निवासी वस्तीतून गेल्या शनिवारी एक तक्रार पोलीस स्थानकात दाखल झाली. तक्रार ऐकून पोलिसांनी लागलीच कारवाईला सुरुवात केली. त्याला कारणच तसं होतं. कारण राहुल कुमार नावाच्या या व्यक्तीने आपल्या तक्रारीत चक्क कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेतलं होतं. बाबा सिद्दिकींची हत्या करणारा आणि सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोई सध्या पोलीस कारवाईच्या केंद्रस्थानी असताना दुसरीकडे त्याच्या नावाने अशा प्रकारची तक्रार दाखल झाल्यामुळे पोलिसांनी लागलीच सूत्र हलवली.

काय होती तक्रार?

लॉरेन्स बिश्नोई गँगकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी आली असून ५ लाख रुपये खंडणीची मागणी आपल्याकडे करण्यात आली आहे, अशी तक्रार राजीव कुमारनं पोलिसांकडे केली. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लागलीच तपास सुरू केला. पण तपासाअंती त्यांच्यासमोर आलेला सगळा प्रकार पाहून पोलीसही चक्रावून गेले.

सासरचा जाच, जावई कंटाळला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून राजीव कुमारचे त्याच्या पत्नीशी वाद चालू आहेत. सततच्या वादांना कंटाळून राजीव कुमारने पत्नी व दोन मुलींना सोडलं. पण यामुळे त्याला सासरकडच्यांच्या म्हणजेच पत्नीच्या घरच्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. गेल्या सहा महिन्यांपासून त्याला सासरच्या मंडळींकडून सातत्याने त्यानं केलेल्या कृत्यावरून फोनवर वा प्रत्यक्ष धमक्या दिल्या जात होत्या. या धमक्यांना कंटाळलेल्या राजीव कुमारने यातून सुटका होण्यासाठी अजब युक्ती शोधून काढली.

Lawrence Bishnoi : ‘लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करा, एक कोटी मिळवा’, करणी सेनेची घोषणा; कारण काय?

आपल्याला थेट लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असून त्याचा परिणाम म्हणून आपण प्रचंड नैराश्यात असल्याचं राजीव कुमारनं पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं. पोलिसांनी जेव्हा धमकीचे फोन आलेल्या क्रमांकावर फोन करून पाहिला, तेव्हा त्याच्या पत्नीच्या घरी फोन लागला. तेव्हा कुठे सगळा प्रकार त्यांच्य लक्षात आला. शेवटी सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी राजीव कुमारला समज दिली व दिबियापूर पोलीस स्थानकाच्या प्रमुखांकडून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला.