Karnataka Suicide News: पत्नीच्या छळाला कंटाळून एका पतीनं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना कर्नाटकच्या हुबळीमध्ये घडली आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं असून त्यात मृत पतीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटबाबतदेखील माहिती देण्यात आली आहे. पीटर गोल्लापल्ली असं मृत पतीचं नाव असून रविवारी त्यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पीटर यांच्या कुटुंबीयांनीदेखील पीटर पत्नीच्या छळामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली होते, असा दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी घटना काय?

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अवघ्या दोन वर्षांपूर्वी विवाह झालेले पीटर गोल्लापल्ली पत्नी फीभी उर्फ पिंकी हिच्यासमवेत हुबळी येथे राहात होते. पण गेल्या काही काळापासून त्यांच्यात कौटुंबिक वाद निर्माण झाले होते. तीन महिन्यांपासून हे वाद चालू होते अशी माहिती पीटर यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. “त्यांच्या लग्नाला दोन वर्षं झाली होती. पण तीन महिन्यांपासून वादामुळे ते वेगळे राहात होते. त्यांच्या घटस्फोटाची केस अजूनही न्यायालयात चालू आहे. पिंकीनं घटस्फोटासाठी २० लाखांची नुकसानभरपाई मागितली होती. त्यामुळे पीटर मानसिक तणावात होता”, अशी माहिती जोएल यांनी दिली आहे.

काय आहे सुसाईड नोटमध्ये?

रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पीटर यांचे कुटुंबीय चर्चमधून परतल्यानंतर त्यांना पीटर यांचा मृतदेह आढळून आला. ‘बाबा, मला माफ करा. माझी पत्नी पिंकीनं माझं जगणं मुश्किल केलं आहे. तिला माझं मरण हवंय. माझ्या पत्नीच्या छळामुळे मी हे पाऊल उचलत आहे’, असं पीटर यांनी पत्रात लिहिलं आहे. दादा, आई-बाबांची काळजी घे’, असं पीटरनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, पीटर यांच्या वडिलांनीही यासंदर्भात पत्नी पिंकीलाच दोष दिला आहे. “माझा मुलगा त्याच्या पत्नीच्या छळामुळेच आमच्यातून निघून गेला. त्यानं तेच पत्रातही लिहिलं आहे. पोलिसांनी ती सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. त्याची पत्नी कधीही उठून माहेरी तिच्या आई-वडिलांकडे निघून जायची. त्यानंतर ती माझ्या मुलाला सांगायची की तुझा जीवही गेला तरी परत येणार नाही. तिच्या भावानं घटस्फोटासाठीची नुकसानभरपाई म्हणून २० लाख रुपये मागितले होते”, असं पीटरचे वडील ओबय्या यांनी सांगितलं आहे.

ऑफिसमध्ये घातला वाद, नोकरी गेली

पिंकीनं एकदा पीटरच्या ऑफिसमध्ये जाऊनही एका बैठकीदरम्यान त्याच्याशी मोठा वाद घातल्याचं ओबय्या यांनी सांगितलं. त्यामुळे पीटरच्या मालकानं त्याला कामावरून काढून टाकलं होतं. या प्रकरणी अशोक नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सखोल तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man died by suicide in huballi karnataka claimes wife harrassment in note pmw