उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका जिममध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथील एक २१ वर्षीय तरुणाचा ट्रेडमिलवर धावताना अचानक मृत्यू झाला आहे. संबंधित तरुणाला ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, मृत तरुणाचं नाव सिद्धार्थ असून तो खोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वती विहार येथील रहिवासी आहे. तो आपल्या पालकांचा एकुलता एक मुलगा असून तो नोएडा येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत होता.
हेही वाचा- दुचाकीवरील तरुणाने ओढणी ओढल्याने शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू…, अपघाताचा धडकी भरवणारा व्हिडीओ आला समोर
व्हायरल व्हिडीओत संबंधित तरुण ट्रेडमिलवर धावताना दिसत आहे. ट्रेडमिलवर धावत असताना अस्वस्थ वाटल्याने तो अचानक थांबला आणि क्षणार्धात खाली कोसळला. यावेळी जिममध्ये व्यायाम करणाऱ्या इतर दोन तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी सिद्धार्थला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. जिममधील या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.