प्रेयसीशी लग्न करण्यासाठी प्रियकराने तिच्या पालकांना गळ घातली. मुलीच्या आईनं प्रियकराला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याचा आणि स्थिरस्थावर होण्याचा सल्ला दिला. पण सल्ला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न न करता २९ वर्षीय माथेफिरू प्रियकरानं १८ वर्षीय प्रेयसीचा गळा चिरून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःलाही संपवले. डोकं चक्रावून टाकणारी ही घटना कर्नाटकच्या बेळगावमध्ये घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कुंदेकर असं प्रियकराचं नाव असून तो पेंटरचं काम करायचा. ऐश्वर्या नावाच्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. ऐश्वर्याशी लग्न करायची इच्छा त्याने तिच्या आईकडे व्यक्त केली होती. पण आईने त्याला चांगलं काम शोधून बरे पैसे कमव आणि आयुष्यात स्थिरस्थावर हो, असा सल्ला दिला होता.
या सल्ल्याला फारसे गांभीर्यानं न घेता प्रशांत ऐश्वर्यावर लग्नाचा दबाव टाकत होता. नुकतीच दहावी पूर्ण केलेल्या ऐश्वर्याने आईच्या सल्ल्यानुसार आताच लग्न करणार नसल्याचं सांगितलं. मंगळवारी (४ मार्च) ऐश्वर्या आपल्या मावशीच्या घरी शहापूर येथे गेली होती. प्रशांतनेही तिथेही तिचा पाठलाग केला. दोघांची वादावादी झाल्यानंतर प्रशांतने धारधार शस्त्राने ऐश्वर्याचा गळा चिरला आणि नंतर आत्महत्या केली.
शहापूर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. गुन्हा घडत असताना त्याठिकाणी कुणीही उपस्थित नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. “आधी दोघांनी एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा. पण मुलीने ऐनवेळी विचार बदलला असावा. त्यामुळे प्रशांतने मुलीला संपवून नंतर आत्महत्या केली”, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.