अलीकडेच दिल्लीतील कंझावला परिसरात एका तरुणीला चारचाकी गाडीने सुमारे १२ किलोमीटर फरपटत नेलं होतं. या घटनेत तरुणीचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना ताजी असताना आता बंगळुरू येथे एका तरुणाने वयोवृद्ध व्यक्तीला फरपटत नेल्याची घटना समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुचाकीस्वार आरोपीने पीडित व्यक्तीच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी पीडित व्यक्तीने आरोपीच्या दुचाकीला पाठिमागून पकडलं असता, आरोपीनं संबंधित वयोवृद्ध व्यक्तीला रस्त्यावरून फरपटत नेलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा- नाशिक: मुलीचा खून करणाऱ्या पित्यास अटक

हा व्हिडीओ कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील मगादी रस्त्यावरील आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती अतिशय वेगाने स्कूटी चालवत आहे. स्कूटीच्या मागे एक वयोवृद्ध व्यक्ती लटकली आहे. आरोपीनं पीडित वृद्धाला जवळपास एक किलोमीटर फरपटत नेलं आहे. अखेर एका रिक्षाचालकाने स्कूटीसमोर रिक्षा आडवा घातल्यानंतर आरोपीनं स्कूटी थांबवली.

या घटनेची अधिक माहिती देताना पीडित व्यक्तीने सांगितलं, “आरोपी दुचाकीस्वाराने माझ्या चारचाकी गाडीला मागून धडक दिली. यावेळी आरोपी तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी त्याची दुचाकी पाठीमागून पकडली. यानंतर त्याने गाडी थांबवण्याऐवजी मला फरपटत नेलं. जेव्हा अपघात झाला तेव्हा आरोपी फोनवर बोलत स्कूटी चालवत होता. त्याने थांबून माफी मागितली असती तर मी त्याला माफ केलं असतं. पण त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मी त्याची स्कूटी पकडली, तरीही त्याने गाडी थांबवली नाही आणि मला फरपटत नेलं. त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man dragged by scooter in bangalore viral video crime news accused arrested rmm