Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानी लष्करी राजदूतांना ‘पर्सोना नॉन ग्राटा’ म्हणजेच देश सोडण्याची नोटीस बजावली आहे. यादरम्यान ही नोटीस बजावण्यात आल्यानंतर काही वेळातच गुरुवारी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात एक व्यक्ती केक घेऊन जाताना पाहायला मिळाला.

सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात बॉक्स घेऊन जाताना दिसत आहे. यावेळी त्याला काही पत्रकारांनी केकेसंबंधी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित व्यक्तीने यावर भाष्य करणे टाळले. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी मात्र पाकिस्तानी उच्चायुक्तालयासमोरील बॅरिकेड्स काढून त्या व्यक्तीला वाट करून दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये २०१९ मध्ये ३७० कलम हटवल्यानंतर करण्यात आलेला हा सर्वात घातक दहशतवादी हल्ला आहे. मंगळवारी झालेल्या या हल्ल्यात किमान २८ पर्यटक ठार झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत. पहलगाम पासून ७ किमी अंतरावर असलेल्या बैसरन भागात हा हल्ला झाला, हे ठिकाण निसर्गरम्य वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य यासाठी प्रसिद्ध आहे.

या हल्ल्यात बचावलेल्या पर्यटकांनी हल्ल्याचा भीषणता सांगितली आहे. त्यांनी दिल्ल्या माहितीनुसार, सहा परदेशी दहशतवादी लष्कराच्या गणवेशात आले आणि त्यांनी धर्माच्या आधारावर पर्यटकांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारली तसेच त्यांना कलमा म्हणायला लावला आणि त्यानंतर जवळून गोळ्या घातल्या. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयानुसार, पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासांत भारत सोडावा लागणार आहे. याचबरोबर कोणत्याही पाकिस्तानी नागरिकास भारतात प्रवेश मिळणार नाही. याचबरोबर केंद्र सरकारने १९६० चा सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात आला आहे.

भारत सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय

  1. १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येत आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहील.
  2. संयुक्त चेकपोस्ट अटारी तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत आहे. ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडली आहे, ते १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात.
  3. पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले व्हिसा रद्द मानले जातील. एसव्हीईएस व्हिसाद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ भारत सोडावा. यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत आहे.
  4. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा.
  5. भारताने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.