पश्चिम बंगालमधील मालदा येथे एक विचित्र घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने हातात बंदूक घेऊन थेट महाविद्यालयात प्रवेश केला. आरोपीने वर्गातील विद्यार्थ्यांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी आरोपीचा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही घटना पश्चिम बंगालमधील मालदा येथील मुचिया चंद महाविद्यालयात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्ती हातात बंदूक घेऊन वर्गात शिरला होता, यानंतर तो खाली बसला आणि वर्तमानपत्र वाचू लागला… हा प्रकार लक्षात आल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून काही बाटल्याही जप्त केल्या. या काचेच्या बाटल्या पेट्रोल बॉम्ब असल्याचा दावा केला जात आहे.
हेही वाचा- अवैध दारू तस्करीसाठी तरुणांचा कहर; सॅनिटरी पॅडच्या आडून सुरू होतं काळं कृत्य
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितलं की, त्याची पत्नी त्याच्या मुलाला घेऊन निघून गेली आहे. तो तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेला, तेव्हा त्याची तक्रार दाखल करून घेतली नाही.
मालदाचे पोलीस अधीक्षक प्रदिप कुमार यादव म्हणाले, “कुणीतरी महाविद्यालयात घुसल्याची आम्हाला माहिती मिळाली. यानंतर आम्हाला समजलं की, तो सशस्त्र आहे. यानंतर आम्ही त्याच्याशी बोलणी केली आणि कोणतीही जीवितहानी न होता त्याला अटक केली. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.”