Ghaziabad Serial Son Case: गाझियाबादमध्ये काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती. ३० वर्षांपूर्वी हरवलेला आपला मुलगा घरी परत आल्याचा आनंद एका कुटुंबाने साजरा केला होता. मात्र ३० वर्षांनी परतलेला आपला मुलगा नसून भलताच कुणीतरी आहे, हे समोर आल्यानंतर कुटुंबाच्या भावनांशी खेळ झाला. त्यांनी लागलीच पोलिसांना याची कल्पना दिली आणि पोलिसांनी भुरट्या तरुणाला अटक केली. चौकशीनंतर पोलिसांना जे समजलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. मुलगा म्हणून जो घरी आला होता, तो अट्टल चोर असल्याचे आता समोर आले आहे. त्याचे खरे नाव इंद्रराज उर्फ राजू मेघवाल असून त्याने आतापर्यंत अशाच प्रकारे नऊ कुटुंबांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. गाझियाबाद पोलिसांनी राजूला अटक केली असून त्याचे फसवणुकीचे चक्र अखेर थांबवले आहे.
सविस्तर घटनाक्रम काय?
२४ नोव्हेंबर – राजू खोडा पोलीस ठाण्यात आला आणि त्याने दावा केला की, ३१ वर्षांपूर्वी त्याचे साहिबाबाद येथून अपहरण झाले होते. नंतर त्याला जैसलमेरच्या एका गावात गोठ्यात काम करण्यास भाग पाडले गेले. मेंढी विकत घ्यायला आलेल्या एका व्यापाऱ्याने त्याची सुटका केली आणि दिल्लीला जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला.
२७ नोव्हेंबर – राजू हा आपला हरवलेला मुलगा असल्याचे तुलाराम यांच्या कुटुंबियांना वाटले. त्यांनी राजूला आपला मुलगा भीम सिंह असल्याचे म्हटले.

३० नोव्हेंबर – राजू भीम सिंह बनून तुलाराम यांच्या घरी गेला होता. मात्र देहरादूनहून एका कुटुबांने फोन करून राजू हा मोनू बनून त्यांच्याकडे आला असल्याचे सांगितले. दिल्लीला नोकरी शोधायला जातो, असे सांगून तो देहरादूनहून निघाला होता.
२ डिसेंबर – राजस्थानच्या सिकर येथून आणखी एक तक्रार आली. त्यांनी सांगितले की, वर्षभरापूर्वी हाच व्यक्ती त्यांचा मुलगा बनून घरी आला होता.
३ डिसेंबर – पोलिसांनी राजू आणि तुलारामच्या कुटुंबियांची डीएनए चाचणी केली.
५ डिसेंबर – राजू हा राजस्थानमधील इंद्रराज मेघवाल असल्याची खात्री पोलिसांना पटली.
६ डिसेंबर – फसवणूक, चोरी करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी राजूला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३८ वर्षीय इंद्रराज मेघवाल हा मुळचा राजस्थानमधील अनुपगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो सवयीने चोर असल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी कंटाळून त्याला २००५ साली घराबाहेर काढले होते. मागच्या काही वर्षात त्याने नऊ कुटुंबियांची फसवणूक केली आहे. कधी कुणाचा मुलगा, भाऊ किंवा नातेवाईक असल्याची बतावणी करत तो घरात प्रवेश मिळवत होता. काही दिवसांनी त्याच घरात चोरी करून तो परागंदा व्हायचा.