मध्य प्रदेशातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. काही जणांच्या टोळक्याने तरुणाला कुत्रा बनण्यास सांगितलं. तसेच, तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधत कुत्र्यासारखं भुंकायला लावलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
व्हिडीओत काय?
भोपाळमधील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओत पीडित तरुण रस्त्यावर खाली बसला आहे. त्याच्या गळ्यात पट्टा बांधला आहे. व्हिडीओ अपलोड केल्यावरून टोळक्यातील व्यक्ती पीडित तरुणाला धमकावत आहेत.
हेही वाचा : ‘वंदे भारत’च्या नावाखाली ‘तेजस’ची सेवा? प्रवाशाने पुराव्यांसकट मांडली कैफियत; तुमच्याबाबतीतही झालंय का असं?
व्हिडीओत पीडित तरुण म्हणतोय की, “साहिल माझे वडील आहेत. तो माझा मोठा भाऊ आहे. त्याची आई माझी आई आहे. मी सॉरी बोललो आहे. मी काही केलं नाही.”
व्हिडीओ अपलोड करण्यास कुणी सांगितलं, असं टोळक्यातील एक जण विचारतो. त्यावर पीडित तरुण सांगतो की, “मी शाहरूखच्या सांगण्यावरून व्हिडीओ अपलोड केला. तो मला धमकावत होता.”
गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
यावर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं की, “तरुणाचा व्हिडीओ पाहिला आहे. अशी वागणूक देणं दुर्दैवी आहे. भोपाळ पोलीस आयुक्तांनी व्हिडीओची सत्यता तपासून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.”
कुटुंबीयांचे गंभीर आरोप
साहिल आणि त्याच्या टोळीतील सदस्यांनी अमली पदार्थाचे सेवन करून धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबाने केला आहे. तसेच, तरुणाला स्वत:च्या घरी चोरी करण्यासही सांगितलं, असेही कुटुंबीयांनी म्हटलं.
हेही वाचा : ट्रॅव्हल एजंटनं बहिणीलाच ओमानमधल्या शेखला विकलं; पीडितेनं सांगितले शेकडो महिलांचे हाल
पोलिसांची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
या घटनेनंतर पीडित तरुणाच्या भावाने पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. या नंतर पीडित तरुणाने सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला. याप्रकरणी आता पोलिसांनी धर्मांतरविरोधी कायदा आणि विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.