पाकिस्तानातील वादग्रस्त ईश्वरनिंदा कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला संतप्त जमावाने जिवंत जाळून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे एक हजारपेक्षा अधिक लोकांनी सिंध प्रांतातील एका गावातील पोलीस ठाण्यावर हल्ला करून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीस जमावाने पेटवून दिल्याचे वृत्त आहे.
दाडू जिल्ह्य़ातील सिता गावात ईश्वरनिंदा केल्याच्या आरोपाखाली एका तीस वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली होती. सदर युवकाला नागरिकांनी ताब्यात घेऊन बेदम मारहाण केली आणि जिवंत जाळले. या वेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेत जमावाला रोखण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे वृत्तपत्रांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे.
सिता गावातील मशिदीतील मौलवी उस्मान मेनन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ज्या व्यक्तीला जमावाने जिवंत जाळले, तो एक यात्रेकरू होता आणि एका रात्रीसाठी तो मशिदीत राहिला होता. गुरुवारी रात्री त्या युवकाने नमाज पडली आणि आणि मशिदीतच झोपी गेला. मात्र शुक्रवारी भाविक मशिदीत आले असता त्यांना कुराण जळलेल्या अवस्थेत आढळून आले. त्या वेळी मशिदीत तो युवक एकटाच राहत असल्यामुळे नागरिकांना त्याचा संशय आला आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. सदर घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला करून त्याला ताब्यात घेतले आणि जिवंत जाळल्याचे मेनन यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत कर्तव्यात कुचराई करणाऱ्या सदर पोलीस ठाण्यातील १० पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक उस्मान घनी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
याप्रकरणी गावातील दोनशे जणांविरोधात पोलिसांच्या कामात अडथळा आणणे तसेच हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे २४ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचेही घनी यांनी सांगितले.