कन्हैयाकुमारचा आरोप,निवडणुकीत प्रचार करणार नाही
देशातील लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने गुरुवारी केला. जातीयवाद व आर्थिक विषमता याविरुद्धचा आपला लढा सुरू राहील, असा निर्धार व्यक्त करणाऱ्या कन्हैयाने येत्या विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले.
रोहित वेमुलाप्रकरणी लढा देणाऱ्या हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत एकजूट व्यक्त करण्यासाठी आलेल्या कुमारला बुधवारी येथे प्रवेशास मनाई करण्यात आली होती. तो ‘घटनात्मक अधिकार’ या विषयावरील चर्चासत्रात
बोलत असताना प्रेक्षकातील
एकाने त्याच्यावर बूट फेकल्यामुळे कुमारला अप्रिय प्रसंगाचा सामना करावा लागला.
मार्क्‍सवादी, आंबेडकरवादी, समाजवादी, लोहियावादी किंवा केंद्रवादी या सर्वावर आज हल्ल्याचे सावट आहे, कारण लोकशाहीच धोक्यात आली आहे, असे कन्हैयाने चर्चासत्रात सांगितले. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्यानेच मी त्यांच्यावर टीका करीत असल्याचे सांगून, काळा पैसा परत आणणे, किमतींवर नियंत्रण ठेवणे आणि रोजगार पुरवणे याबाबत भाजपने दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करणारी कविता त्याने म्हणून दाखवली.

हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात आणीबाणीसदृश परिस्थिती असून त्यासाठी कुलगुरू अप्पा राव हेच जबाबदार असल्याचा आरोप येथील विद्यार्थी संघटनेने केला आहे. पाणी नाही, वीज नाही, अन्न नाही अशा ‘आणीबाणीसदृश’ परिस्थितीचा विद्यार्थ्यांना ४८ तास सामना करावा लागला. विद्यार्थ्यांची मेस बंद, इंटरनेट डाऊन आणि एटीएम यंत्रे निकामी या गोष्टींची त्यात भर पडली. स्थानबद्ध केले जाण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांना अतिसावध राहणे भाग झाले आहे. किराणा व खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी विद्यार्थ्यांना या परिसरातील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये जाणे भाग पडले.वीज आणि भोजनगृहाची सेवा गुरुवार सकाळपासून सुरू झाली. या परिसरात पोलिसांचा जोरदार बंदोबस्त असून ते विद्यार्थ्यांविरुद्ध खोटय़ा केसेस दाखल करत आहेत, असे तुषार घाडगे या विद्यार्थ्यांने सांगितले.

डाव्या पक्षांतर्फे संचालित बाघलिंगमपल्ली येथील सुंदरय्या विज्ञान केंद्रम येथे आयोजित चर्चासत्रात प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने कन्हैया कुमारच्या दिशेने बूट भिरकावला, पण त्याचा नेम चुकल्याने तो व्यासपीठावरच पडला. यानंतर सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Story img Loader