काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या गुजरातमध्ये दाखल झाली आहे. दरम्यान गुजरातमध्ये राहुल गांधी यांची सभा सुरु असताना एका व्यक्तीने व्यत्यय आणला. तुम्ही अनुवादन करणाऱ्यासाठी न थांबता सलग हिंदीत बोला अशी विनंती त्याने केली. ‘तुम्ही हिंदीत बोला, आम्हाला समजेल. आमच्यासाठी भाषांतर करण्याची गरज नाही,’ असं त्या व्यक्तीने गर्दीतूनच ओरडून सांगितलं.
यानंतर राहुल गांधींनी भाषण थांबवलं आणि मंचावरुनच ‘तुम्हाला चालेल का?’ अशी विचारणा केली. गर्दीने होकार दिल्यानंतर राहुल गांधी यांनी हिंदीत संपूर्ण भाषण केलं.
विधानसभा निवडणूक असणाऱ्या गुजरातमधील राहुल गांधी यांची ही पहिलीच प्रचारसभा होती. सुरत जिल्ह्यातील महुआ येथे त्यांनी सभेला संबोधित केलं. आदिवासी हे देशाचे पहिले मालक असून, भाजपा हा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
आदिवासींचे हक्क भाजप हिरावत आहे : राहुल गांधी; गुजरातमध्ये पहिली प्रचारसभा
“ते तुम्हाला वनवासी म्हणतात. तुम्ही देशाचे पहिले मालक असल्याचं ते सांगत नाही. पण जंगलात राहता हे सांगतात. तुम्हाला यामधील फरक कळतोय ना? याचा अर्थ तुम्ही शहरात राहावं असी त्यांची इच्छा नाही. तुमची मुलं इंजिनिअर, डॉक्टर, वैमानिक व्हावेत, त्यांनी चांगलं इंग्रजी बोलावं असं त्यांना वाटत नाही,” अशी टीका राहुल गांधींनी यावेळी केली.
गुजरातमध्ये आज भाजपाच्या तीन प्रमुख नेत्यांच्या सभा पार पडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज गुजरातमध्ये असणार आहेत.
गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. १ आणि ५ डिसेंबरला मतदान होणार असून, ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यात गेल्या २७ वर्षांपासून भाजपाची सत्ता असून, सातव्यांदा निवडणूक जिंकण्याच्या तयारीत आहेत.