Karnatak mob lynching over Pakistan Zindabad slogan : कर्नाटकच्या मंगळुरू येथे एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान कथितरित्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणा दिल्या प्रकरणी एका व्यक्तीला नागरिकांनी मारहाण करून ठार केल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी झालेल्या या धक्कादायक घटनेनंतर १० जणांना अटक करण्यात आली आहे.

कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी या घटनेची पुष्टी केली आहे, त्यांनी सांगितले की पीडित व्यक्तीचा तात्काळ मृत्यू झाला नाही. मात्र त्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याचा नंतर मृत्यू झाला. तसेच त्यांनी या प्रकरणात सविस्तर अहवाल येणे बाकी असून आरोपींना अटक करण्यात आल्याचेही स्पष्ट केले.

“एका अज्ञात व्यक्तीला जमावाकडून मारहाण केल्याची घटना घडली आहे. मला माहिती मिळाली की स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान तो ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे ओरडत होता, ज्यामुळे काही लोकांनी त्याला मारहाण केली. त्याचा जागीच मृत्यू झाला नाही तर तो नंतर मरण पावला. मला अद्याप संपूर्ण अहवाल मिळालेला नाही. सुमारे १० ते १२ जणांना अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे,” अशी माहिती मंत्र्‍यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

नेमकं काय घडलं?

इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार, ही घटना रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान घडली, या स्पर्धेत १० संघ आणि १०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्त आणि सचिन नावाच्या व्यक्तीमध्ये वादाला सुरूवात झाली जो पुढे चांगलाच वाढला आणि यामध्ये गट सहभागी झाला. बाजूला उभ्या असलेल्या लोकांन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण गर्दीतील काही लोकांनी त्या व्यक्तीला काठ्या आणि लाथांनी मारहाण सुरूच ठेवली. या घटनेबद्दल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिसांना कळवण्यात आले, यावेळी पीडित व्यक्तीचा मृतदेह जवळच्या मंदिराजवळ आढळून आला.

मंगळुरू पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी माध्यमांना सांगितले की, सुरुवातीला कोणत्याही गंभीर जखमा दिसून आल्या नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांना नैसर्गिक मृत्यू झाल्याचा संशय आला. नंतर हे प्रकरण मंगळुरू ग्रामीण पोलिसांना सोपवण्यात आले. मात्र या प्रकरणाबद्दल संध्याकाळी नवीन माहिती समोर आली, ज्यामध्ये त्या व्यक्तीला सामन्यादरम्यान झालेल्या हल्ल्यात शारीरिक मारहाण झाल्याचे दिसून येत होते.

तरुणाला अमानुष मारहाण

वेनलॉक जिल्हा रुग्णालयात केलेल्या शवविच्छेदनात त्याच्या पाठीवर वारंवार वार करण्यात आल्याने अंतर्गत रक्तस्त्राव आणि धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. तसेच त्याच्या पाठीवर, नितंब आणि गुप्तांगावर वारंवार लागडाने मारहाण केल्याच्या जखमा देखील तपासकर्त्यांना आढळून आल्या आहेत.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, ३३ वर्षीय स्थानिक रहिवासी दीपक कुमार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये १९ जणांची नावे देण्यात आली आहेत, तसेच मोबाईल डेटा आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणखी संशयीतांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. पोलिस या प्रकरणात पुरावे गोळा करत आहेत जेणेकरून जास्तीत जास्त आरोपींना अटक करण्यात येईल.