Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४१ वर्षीय एका विवाहित पुरुषाने मागच्या वर्षी मार्च महिन्यात त्याची प्रेयसी लिव्ह इन पार्टनरची हत्या केली आणि तिचा मृतदेह तेव्हापासून फ्रिजमध्ये ठेवला होता. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागताच त्यांनी याबद्दलची तक्रार केली आणि नंतर या क्रूर कृत्याचा उलगडा झाला. यानंतर पोलिसांनी उज्जैनमधून आरोपीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, घरातून दुर्गंधी येण्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही घराची झडती घेतली असता फ्रिजमध्ये प्रतिभा पाटीदार यांचा मृतदेह आढळून आला. प्रतिभा मागच्या वर्षी त्यांचा लिव्ह इन पार्टनर संजय पाटीदारबरोबर राहत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस अधीक्षक पुनीत गेहलोत यांनी सांगितले की, मृतदेह आढळल्यानंतर काही तासातच आम्ही संजय पाटीदारला अटक केली. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिभा मागच्या वर्षी मार्च महिन्यानंतर दिसली नव्हती. तर संजय पाटीदार जून २०२४ मध्येच भाड्याचे घर सोडून निघून गेला होता. संजय पाटीदारने पोलिसांना सांगितले की, तो पाच वर्षांपासून प्रतिभाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.

२०२३ साली संजय आणि प्रतिभा देवास येथे आले होते. दे दोघेही विवाहित आहेत, असे ते लोकांना सांगत असत. जानेवारी २०२४ मध्ये दोघांमध्ये खटके उडायला लागले. प्रतिभाने लग्न कराण्यासाठी संजयमागे तगादा लावला होता. ज्यामुळे संजय संतापला आणि त्याने या कारणावरून प्रतिभाशी वाद घालायला सुरुवात केली. मार्च २०२४ मध्ये संजयने त्याचा मित्र विनोद दवेसह मिळून प्रतिभाला मारण्याचा कट रचला. दोघांनी मिळून प्रतिभाचा गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर हात-पाय बांधून मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला.

मृतदेह फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर आरोपी संजय पाटीदारने भाड्याचे घर सोडले. मात्र आपले सामान इथेच ठेवू देण्यासाठी घरातील एक खोली स्वतःकडेच ठेवण्याची विनंती मालक धीरेंद्र श्रीवास्तव यांच्याकडे केली. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, संजय अधून-मधून घरी येत जात होता. अलीकडेच श्रीवास्तव यांनी हे घर बलवीर राजपूत नामक व्यक्तीला भाड्याने दिले. यावेळी राजपूत यांनी संजय पाटीदारची बंद असलेली खोली पाहण्याची विनंती केली. ही खोली दाखविल्यानंतर त्या खोलीतील फ्रिजचे कनेक्शन सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी फ्रिज बंद केला. ज्यामुळे दोन दिवसानंतर त्यातून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली.

आरोपी संजय पाटीदार हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man killes live in partner body keeps in fridge from 8 months in madhya pradesh kvg