human Sacrifice in Gujrat: केरळमधील नरबळी प्रकरण ताजे असतानाच गुजरातमधील एका गावात वडिलांनी १४ वर्षीय मुलीचा अंधश्रद्धेतून खून केल्याचे समोर आले आहे. भुतबाधा झाल्याच्या संशयातून काळा जादू करताना मुलीचा नाहक बळी गेल्याची धक्कादायक घटना गीर सोमनाथ जिल्ह्यातील धावा गावात घडली आहे.
केरळमध्ये जोडप्यांकडून दोन महिलांचा नरबळी; मृतदेहाचे तुकडे करुन मांसही खाल्ले!
“आरोपी वडील भावेश अकबारी सहा महिन्यांपूर्वी सुरतमधून धावा गावात आले होते. या गावात भाऊ दिलीपच्या सोबतीनं त्यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीवर जादूटोणा केला”, अशी माहिती गीर सोमनाथ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोहर सिंग जडेजा यांनी दिली आहे. “पीडित मुलीला चाखिलदार मैदानात नेण्यापूर्वी जुने कपडे घालण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही आरोपींनी मुलीला शेकोटीजवळ दोन तास उभे केले. त्यानंतर आरोपींनी मुलीचे कपडे जाळून तिला मारहाण केली. पीडितेच्या केसांना काठी बांधून तिला दोन खुर्च्यांमध्ये उभे केले. अनेक तासांपर्यंत या मुलीला तहानलेलं आणि उपाशी ठेवत तिचा अमानुष छळ करण्यात आला”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या क्रुर घटनेचे पुरावे आरोपींनी नष्ट केले आहेत.
या मुलीवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यापूर्वी तिचा मृतदेह प्लास्टिक आणि ब्लँकेटमध्ये गुंडाळण्यात आला होता. या प्रकरणातील प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतलं आहे. आरोपी भावेश अकबारी हे गावात एकांतात राहायचे. शिवाय कोणाबरोबरही त्यांचा संपर्क नव्हता, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
हॉटेलमध्ये जेवण न दिल्याचा राग, भाजपा मंत्र्याच्या पुतण्याने कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घातली
दरम्यान, बुधवारी केरळमध्ये एका जोडप्यानं झटपट श्रीमंत बनण्याच्या हव्यासापोटी दोन महिलांचा बळी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर मृतदेहाचे तुकडेही या जोडप्यानं खाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी जादूटोणा आणि नरबळी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी जोडपे आणि त्यांच्या साथीदाराला अटक केली आहे.