Lucknow horror: अवघे जग २०२५ च्या स्वागतामध्ये मश्गूल असताना लखनऊमध्ये एक भयानक घटना घडली. उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील एका हॉटेलमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या एका कुटुंबातील चार बहिणी आणि आईचा खून करण्यात आला आहे. २४ वर्षीय भाऊ अर्शदने हे हैवानी कृत्य केले असून त्याने यामागणी कारणीमीमांसा एका व्हिडीओद्वारे सांगितली आहे. पोलिसांनी आरोपी अर्शदला अटक केली असून त्याच्या वडिलांचा शोध घेतला जात आहे. शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर अर्शदने हे धक्कादायक पाऊल उचलले. तसेच त्याच्या बहिणींना विकण्याचा प्रयत्न झाला असता, असाही दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्शदचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने बदायूँ येथील त्याचे घर जमीन माफियांनी हडप केल्याचे म्हटले आहे. जमीन माफिया माझ्या बहिणींना विकणार होते, असा दावा त्याने केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतांमध्ये ४९ वर्षीय आई अस्मान, मुलगी अलिशिया (१९), रहमीन (१८), अक्ष (१६) आणि आलिया (९) या चार मुली आहेत. पोलिसांनी आरोपी अर्शदला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

हे वाचा >> Lucknow Crime : धक्कादायक! लखनऊ हत्याकांडाने हादरलं; चार बहिणीसह आईची हत्या, मुलाला अटक तर वडील फरार

व्हिडीओमध्ये अर्शदने काय म्हटले?

खून केल्यानंतर अर्शदने व्हिडीओ रेकॉर्ड करून यामागचे कारण सांगितले आहे. अर्शद म्हणाला, “आमच्या शेजाऱ्यांच्या छळाला कंटाळून आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. मी आई आणि बहिणींची हत्या केली. पोलिसांना जेव्हा हा व्हिडीओ प्राप्त होईल, तेव्हा त्यांनी आम्हाला त्रास देणाऱ्यांचा शोध घ्यावा. आमचे घर हडपले. आम्ही आवाज उचलला पण कुणीही आमची मदत केली नाही. मागच्या १५ दिवसांपासून माझे कुटुंबिय रस्त्यावर थंडीत कुडकुडत झोपत आहोत.”

या व्हिडीओमध्ये अर्शदने काही जमीन माफियांचीही नावे घेतली आहेत. हे लोक मुली विकण्याचेही काम करतात. मला आणि माझ्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना माझ्या बहिणींना विकायचे होते. हे आम्हाला मान्य नव्हते, म्हणूनच आम्ही बहिणींना मारण्याचा निर्णय घेतला, असे धक्कादायक कारण अर्शदने व्हिडीओद्वारे सांगितले आहे.

लखनऊच्या सेंट्रल झोनचे पोलीस उपायुक्त रवीना त्यागी यांनी या प्रकरणावर बोलताना सांगितले की, अर्शदने आपला गुन्हा कबूल केला आहे. हत्या केल्यानंतर अर्शदने वडिलांना रेल्वे स्थानकावर सोडले आणि पोलीस ठाण्यात जाऊन शरणागती पत्करली. त्याच्या जबाबानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले ब्लेड आणि ओढणी ताब्यात घेतली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man kills mother and four sisters says didnt want them to be sold recorded video viral kvg