महागडा आणि सर्वांच्या पसंतीस उतरलेला आयफोन घेण्याकडे अनेकांचा कल असतो. आयफोन वापरणं स्टेटस सिम्बॉल झालं आहे. यासाठी आयफोनच्या चोरीपासून आयफोनची डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे. लखनऊमध्येही असाच प्रकार घडला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३० वर्षीय डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर इंदिरा कालव्यात त्याचा मृतदेह फेकण्यात आला असून एसडीआरएफकडून त्याच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. यासंदर्भात पोलीस उपायुक्त शशांक सिंग यांनी सांगितलं की, चिनहाट येथे राहणाऱ्या गजानन याने फ्लिपकार्टवरून आयफोन ऑर्डर केला होता. तसंच, कॅश ऑन डिलिव्हरी मोडवरून ही ऑर्डर करण्यात आली होती. २३ सप्टेंबर रोजी भरत साहू नावाचा डिलिव्हरी मुलगा आयफोन घेऊन गजानन राहतो त्याठिकाणी गेला. त्याने गजाननला आयफोनही दिला. त्यावेळी गजानन बरोबर त्याचा आणखी एक मित्र होता. कॅश ऑन डिलिव्हरी करायची असल्याने मोबाईल घेतल्यावर गजाननला दीड लाख रुपये द्यायचे होते. परंतु, गजाननने त्याचा गळा घोटला. त्यानंतर त्याचा मृतदेह एका बॅगेत भरला आणि इंदिरा कालव्यामध्ये जाऊन फेकला.

असा लागला हत्येचा छडा

दोन दिवसांनंतरही भरत साहू घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याची २५ सप्टेंबर रोजी हरवल्याची पोलीस तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स तपासले. या तपासातून गजानननेच शेवटचा कॉल केला असल्याचं स्पष्ट झालं. त्यानुसार पोलिसांनी गजाननचा मित्र आकाशशी संपर्क साधला.

हेही वाचा >> फक्त एक क्लिक आणि १० मिनिटांच्या आत iPhone 16 तुमचा, Blinkitने अवघ्या काही वेळातच केला ३०० ऑर्डर्सचा टप्पा पार

आकाशची चौकशी केल्यानंतर त्याने पोलिसांना घडलेली सर्व हकिगत सांगितली. त्यामुळे हा प्रकार उजेडात आला. दरम्यान, अद्यापही मृतदेह पोलिसांना सापडलेला नाही. एसडीआरएफकडून त्याच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.

मुंबईत भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीने खरेदी केले होते दोन आयफोन

आयफोन १६ लाँच झाल्यापासून अनेक मोबाइलवेड्या चाहत्यांची आयफोन घेण्यासाठी धडपड दिसून आली. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील आयफोन स्टोअरमध्ये १६ ते १८ तास रांगेत उभं राहिल्यानंतर आयफोन विकत घेतलेल्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. विशेषतः तरूणांमध्ये आयफोनचं प्रचंड वेड आहे. पण आयफोनचं वेड हे तरूण, कटेंट क्रिएटर्स, प्रोफेशनल्स यांच्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तर भंगार गोळा करणाऱ्या एका व्यक्तीलाही आयफोनची भुरळ पडली आहे. या व्यक्तीने तब्बल दोन महागडे आयफोन विकत घेतले आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man order iphone online worth rs 1 5 lakh on cash on delivery option killed agent sgk