एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेवर लघुशंका करणाऱ्या मुंबईतील शंकर मिश्रा याला त्याच्या कंपनीने कामावरून काढून टाकले आहे. शंकर मिश्रा (वय-३४) यांच्यावर झालेले आरोप अत्यंत लज्जास्पद आहेत, असं कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
“वेल्स फार्गो ही कंपनी व्यावसायिक कौश्यल्ये आणि वैयक्तिक वर्तन या दोन पातळ्यांवर आपल्या कर्मचाऱ्यांची निवड करते. आमच्या कर्मचाऱ्यावर झालेले आरोप खूप त्रासदायक आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याची आम्ही कंपनीतून हकालपट्टी करत आहोत,” असं कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे. शंकर मिश्रा हा सध्या बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नेमकं प्रकरणं काय आहे?
२६ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा याने बिझनेस क्लासमधील एका महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. यावेळी आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकारानंतर पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार करू नये म्हणून आरोपीनं त्यांची लेखी माफी मागितली. पोलिसांत तक्रार केल्यास त्याचा पत्नी आणि मुलांवर वाईट परिणाम होईल, अशी याचना आरोपीने केली होती. यानंतर पीडित महिलेनं आरोपीला माफ करून पोलिसांत तक्रार करणं टाळलं होतं.
पण अलीकडेच एअर इंडिया कंपनीने आरोपी शंकर मिश्रा याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच मिश्रा याच्यावर ३० दिवस विमानातून प्रवास करण्यावर बंदी घातली आहे.