Man Staged Own Kidnapping to Extort Ransom : उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातून एक गमतीशीर प्रकरण समोर आले आहे. बंदराहा गावातील एका तरुणाने आपले अपहरण झाल्याचा बनाव करत आपल्याच भावाकडे खंडणी मागितली होती. पण, खंडणी मागण्यासाठी लिहिलेल्या चिठ्ठीत स्पेलिंग चुकल्याने पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये या प्रकरणाचा छडा लावला. दरम्यान ही घटना ५ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. यामध्ये अपहरणाचा बनाव करणाऱ्याने मोठ्या भावाकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील बंदराहा गावातील संजय कुमार यांना त्यांचा धाकटा भाऊ संदीप याचे अपहरण केले असल्याचा एक व्हिडिओ आला होता. यामध्ये त्याला एका झाडाला बांधल्याचे दिसत होते. याचबरेबर त्यांना एक चिठ्ठीही मिळाली होती. ज्यात ५० हजार रुपये नाही दिले तर भावाचा मृत्यू होईल असे म्हटले होते. इंग्रजीमध्ये लिहिलेल्या चिठ्ठीत आपहरणकर्त्यांनी मृत्यूची (Death) स्पेलिंग (Deth) अशी लिहिली होती.

“पीडीत तरुणाचा भाऊ संजय यांना मिळालेल्या चिठ्ठीत मृत्यू (Death) या शब्दाची स्पेलिंग चुकीची लिहिल्याचे लक्षात आल्यानंतर आम्हाला अंदाज आला की, अपहरणकर्ते अशिक्षित आहेत. याचबरोबर मागितलेली खंडणीची रक्कम संजय यांच्या आर्थिक परिस्थितीच्या तुलनेत खूपच कमी होती आणि त्यांचे कोणाशी वाद किंवा वैरही नव्हते. यामुळे आम्हाला या प्रकरणाची वेगळीच शंका आली”, असे पोलीस अधिक्षक नीरज जनौद यांनी सांगितले.

पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला आरोपी?

संजय यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संदीपचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना संदीप रूपापूरजवळ सापडला. संपूर्ण घटनेबाबत संदीपकडे चौकशी केली असता, तो पोलिसांना समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

अशात पोलीस अधिक्षकांनी एक क्लुप्ती केली आणि संदीपला एक अर्ज लिहण्यास सांगितले. यामध्ये त्यांनी संदीपला ‘डेथ’ या शब्दाचा उल्लेख करायला सांगितला तेव्हा संदीपने ‘डेथ’ची स्पेलींग Deth अशी लिहिली आणि प्रकरणाचा खुलासा झाला.

हे ही वाचा : Video: गावकऱ्याची कमाल, पळणाऱ्या बिबट्याची शेपटी पकडून धरून ठेवलं अन् लोकांचा जीव वाचवला; व्हिडीओ होतोय व्हायरल

पोलिसांनी असे करण्यामागील कारणांची चौकशी केल्यानंतर, त्याने मोठ्या भावाकडून पैसे घेण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा कट आखल्याचे सांगितले. दरम्यान संदीपच्या दुचाकीच्या धडकेमुळे एक वृद्ध व्यक्ती जखमी झाला होता. त्याच्या उपचारासाठी संदीपला ८० हजार रुपयांची गरज होती, असेही त्याने पोलीस चौकशीत नमूद केले आहे.

Live Updates
Story img Loader