अयोध्येतील नव्यानं बांधण्यात आलेल्या श्री राम मंदिरात रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी ( २२ जानेवारी ) करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली. रामलल्ला मंदिरात विराजमान झाल्यानंतर देशभरात उत्सहाचं वातावरण निर्माण झालं आहे. हरियाणातील भिवानी येथे ‘राज टिळक’ नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हनुमानाचे पात्र साकारणाऱ्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एकच हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
मेरे मन के मंदिर में है मेरे प्रभु का धाम… मेरे अंतर के आसन पर सदा विराजे राम! या गीतावर सगळे नाचत होते. प्रभू श्री राम नाटकात हनुमानाचे पात्र साकारणारे हरीश मेहता भक्तीत तल्लीन झाले होते. गीत संपत असतानाच हरीश अचानक रामलल्लाचे पात्र साकारणाऱ्या व्यक्तीच्या पायाजवळ पडले.
नागरिकांना वाटलं हा नाटकाचा भाग असून भावनेच्या भरात हरीश जमिनीवर पडले असतील. नागरिक टाळ्या वाजवू लागले. रामाचे पात्र साकारणाऱ्या व्यक्तीनं हरीश यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण, हरीश उठले नाहीत. त्यानंतर हरीश यांना रूग्णालयात दाखल केलं. तेव्हा डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्यानं हरीश यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.
हरीश वीज वितरण विभागात कनिष्ठ अभियंता पदावरून निवृत्त झाले होते. गेल्या २५ वर्षांपासून ते हनुमानाचे पात्र साकारत होते.