राजस्थानमधील चुरू येथील एका व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढंच नव्हे तर नराधमाने पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भनिरोधक गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केला आहे. पीडित मुलीने आपल्या मामाला याची माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोक्सो (बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील आहे. पीडितेने २१ ऑगस्ट रोजी घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या मामाला सांगितला. त्यानंतर मामाने आरोपी मेहुण्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
हेही वाचा- आधी गोड बोलले, जेवू घातलं मग फसवलं; प्रियकराला मारहाण करत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
पत्नीच्या मृत्यूनंतर मुलीला बनवलं वासनेची शिकार
‘झी राजस्थान’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित मुलीच्या आईचं २०२० मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तेव्हापासून ती वडील आणि भावासोबत राहत होती. तिच्या आईच्या मृत्यूनंतरच तिच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. याला विरोध केला असता वडिलांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने वडिलांकडून सुरू असलेल्या अत्याचाराबद्दल कुणालाही सांगितलं नाही.
हेही वाचा- मुंबईत दोन सावत्र मुलांसह नवऱ्याकडून महिलेवर गँगरेप, अत्याचाराचे VIDEO पॉर्न साइटवर केले अपलोड
पीडितेनं सांगितलं की, तिच्या आईच्या मृत्यूनंतर १५ दिवसांतच वडिलांनी तिच्यावर बलात्कार करायला सुरुवात केली. यादरम्यान ती गरोदर राहिली. त्यानंतर वडिलांनी तिला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या आणि तिचा गर्भपात केला. २० ऑगस्ट रोजी वडिलांकडून बलात्कार होत असताना पीडितेच्या भावाने हा सर्व प्रकार पाहिला. यानंतर वडिलांनी मुलाला बेदम मारहाण केली आणि घरातून हाकलून दिले. पीडितेचा भाऊ आता आपल्या मामाकडे राहत आहे. पीडितेनं पुढे सांगितले की, तिचा भाऊ मामाच्या घरी निघून गेल्यावर आरोपी वडिलांनी तिला मारहाण केली आणि तोंडात बोळा कोंबून बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.