Facebook Post : आसाम येथील धेकिअजुली येथील व्यक्तीवर हसण्याची इमोजी वापरत प्रतिक्रिया दिल्यावरूम गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दुसर्‍या एका व्यक्तीने कोकराझारच्या (Kokrajhar) जिल्हा उपायुक्त वरनाली देका (Varnali Deka) यांनी मेकअप केला नसल्याबद्दल फेसबुकवर केलेल्या कमेंटला रिप्लाय देताना ही ‘हाहा’ इमोजी वापरली होती.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव अमित चक्रवर्ती असे आहे. दरम्यान आयएएस अधिकारी डेका यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या व्यक्तीला त्याच्या शहरापासून २७३ किमी अंतरावरील कोकराझार येथील कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले आहे.

या महिला अधिकाऱ्याने इमोजी वापरणारा अमित चक्रवर्ती आणि फेसबुकवर कमेंट करणार्‍या व्यक्तीसह इतर दोघांवर सायबर स्टॉकिंग आणि अपमानास्पद लैंगिक टिप्पणी केल्याचा आरोप केला आहे.

नेमकं काय झालं?

चक्रवर्ती यांनी नरेश बारुआ याने डेका यांच्या फोटोवर केलेल्या कमेंटला ‘हाहा’ म्हणजेच हसतानाची इमोजी वापरून प्रतिक्रिया दिली होती. बारुआ यांनी डेका यांच्या पोस्टवर कमेंट करताना मॅडम, आज मेकअप केला नाही? (नो मेकअप टुडे, मॅम?) अशी कमेंट केली होती.

डेका यांनी नरेश बारुआचा कमेंटवर, “तुम्हाला काय अडचण आहे?” असं उत्तर देखील दिलं होतं. मात्र या कमेंटचा मुद्दा पुढे चांगलाच पेटला आणि डेका यांनी कोकराझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी आपल्या तक्रारीत चक्रवर्ती, बारूआ आणि तिसरा व्यक्ती अब्दुल सुदूर चौधरी यांच्यावर आरोप केले आहेत.

डेका यांनी दिला होता इशारा

न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये डेका आणि तिन्ही आरोपींबरोबर झालेल्या संवादाचे स्क्रीनशॉट जोडण्यात आले आहेत. ज्यानुसार एका पोस्टमध्ये डेका यांनी “कृपया भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ ड अंतर्गत येणारे सायबर स्टॉकिंगचे कलम एकदा तपासून घ्या,” असा इशारा देखील चौधरी याला दिला होता. “तुम्ही त्या अंतर्गत दोषी आहात आणि मी सायबर सेलकडे तक्रार दाखल करत आहे. तुम्ही मला स्टॉक करण्यापेक्षा तुमच्या कामावर लक्ष द्यायला हवे होते”, असेही डेका म्हणाल्या.

चक्रवर्ती यांना टॅग करत केलेल्या दुसर्‍या एका पोस्टमध्ये डेका म्हणाल्या होत्या की, “हे अपमानास्पद आणि लैंगिकदृष्ट्या रंगभेद करणारी टिप्पणी आहे. कलम ३५४ अ तपासा. मी तुमच्या विरोधात तक्रार दाखल करत आहे.”

आरोपीचं काय म्हणणं आहे?

दरम्यान माध्यमांशी बोलताना या संपूर्ण प्रकरणावर बोलताना चक्रवर्ती याने सांगितले की, “मी फक्त फेसबुक पोस्टवर रिअॅक्ट केलं होतं… आणि हसल्याबद्दल आज मला जामीन घ्यावा लागला. मला माहिती नाही की वरनाली डेका या आयएस अधिकारी आहेत की उपायुक्त.”

त्यांनी सांगितलं की जानेवारी २३ रोजी कोकराझार पोलीस ठाण्यातून अधिकाऱ्याचा मला फोन आला. “मी जेव्हा विचारलं की कोणतंही कारण नसताना मी का हजर राहू?, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.”

“मी जेव्हा याबद्दल सविस्तर माहिती विचारली तर त्यांनी मला काहीही सांगितलं नाही. त्यानंतर माझअया एका वकील मित्राच्या मदतीने मी याबद्दल माहिती घेतली. मला समजत नाही की एका आयएएस अधिकार्‍याला इतक्या क्षुल्लक बाबीसाठी अशी टोकाची कारवाई करायला वेळ कसा मिळतो.”

“फक्त माझ्या रिअॅक्शनमुळे, फेसबुकवरील हसण्याच्या इमोजीमुळे मला जेरीस आणण्यात आले. मी फक्त नरेश बोरूआ याने केलेल्या पोस्टवर रिअॅक्ट केलं… मला या प्रकरणाबाबत आणखी काहीही आठवत नाही,” असेही चक्रवर्ती याने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man reply haha to no makeup today maam comment on ias officer facebook post case filled in assam marathi news rak