Man Set Himself On Fire At Parliament : दिल्लीत आज नव्या संसद भवनाजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दुपारी एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान तेथे घटना घडली त्यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांसह रेल्वे पोलिसांनी तातडीने आग विझवली. त्यानंतर संसद भवनाच्या सुरक्षा रक्षकांनी जखमी व्यक्तीला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी पोलिसांना घटनास्थळावर अर्धवट जळालेली दोन पानांचे पत्र सापडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समोर आलेल्या माहितीनुसार पीडिताचे नाव जितेंद्र असे असून, तो उत्तर प्रदेशातील बागपतचा आहे. या पीडित व्यक्तीने रेल्वे भवनाजवळील एका उद्यानात स्वत:ला पेटवून घेतले आणि नंतर संसद भवनाच्या दिशेने तो धावू लागला, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान रेल्वे भवन नव्या संसद भवनाच्या इमारतीसमोर आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “घटनेतील पीडित व्यक्तीचे बागपतमधील एका कुटुंबाशी वाद आहे. या वादामुळे दोन्ही कुटुंबांनी तुरुंगवास भोगला आहे. या घटनेमुळे पीडित जितेंद्र व्यथित होता. त्यामुळे जितेंद्र आज रेल्वेने दिल्लीला आला. त्यानंतर जितेंद्रने रेल्वे भवन परिसरातील उद्यानात अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले.”

“या पीडिताला रुग्णालयात दाखल करेपर्यंत तो गंभीरपणे भाजला होता. त्याच्यावर आता बर्न्स युनिटमध्ये उपचार सुरू आहेत,” असे पोलिसांनी पुढे सांगितले.

व्हिडिओ व्हायरल

आज दुपारी ३.३५ च्या सुमारास अग्निशमन दलाला या घटनेबाबत फोनवरून माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान पोलीस आणि फॉरेन्सिक तपास पथकाने घटनास्थळी पुरावे गोळा केले. घटनेनंतर लगेचच घटनास्थळावरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये पीडित व्यक्तीला काळ्या ब्लँकेटने झाकलेले दिसत आहे.

हे ही वाचा : महिला सन्मान योजना नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशींनी दिला ‘हा’ मोठा इशारा

काय म्हणाले पोलीस?

या घटनेविषयी दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त मधुप तिवारी यांनी सांगितले की, “रेल्वे भवन चौकासमोर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना दुपारी साडेतीन वाजता घडली. त्यानंतर तो धावत सुटला. हे पाहिल्यानंतर घटनास्थळी असलेल्या पोलीस आणि नागरिकांनी आग विझवण्यात मदत केली आणि त्याला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले. जितेंद्र कुमार असे या घटनेतील पीडिताचे नाव आहे. तो बागपतचा आहे. तेथे शेजाऱ्यांशी भांडल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. त्याचे म्हणणे आहे की, बागपत पोलीस या प्रकरणांचा योग्य तपास करत नसल्याने त्याला न्याय मिळेना.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man sets himself ablaze runs towards parliament in new delhi aam