Crime News : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने अपमान झाल्याच्या भावनेने संतप्त झालेल्या व्यक्तीने ग्रुप अ‍ॅडमीनची गोळ्या घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी आणि पीडित व्यक्तीमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्नही करण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करत आरोपीने ग्रुप अ‍ॅडमिनचा पाठलाग करून त्याला गोळ्या घातल्या. ही घटना पाकिस्तानच्या पेशावर शहरातील रेगी सफेद संग भागात ७ मार्च रोजी घडली. पाकिस्तानी माध्यमांनी यासंबंधीचे वृत्त दिले आहे. दरम्यान ही घटना उजेडात आल्यानंतर सोशल मीडियावर याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

हत्येचा आरोपी अश्फाक याला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन मुश्ताक अहमद याने ग्रुपमधून का काढून टाकले याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. मात्र दोघांमध्ये आधीपासून शत्रुत्व असू शकते, मात्र अश्फाक याला ग्रुपमधून काढून टाकल्याने त्यांच्यामधील वादाचा भडका उडाला असू शकतो असे सांगितले जात आहे.

भारतातही घडली होती घटना

भारतातही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सबंधीत वादातून हल्ले झाले आहेत. २०२३ मध्ये एनसीआरमधील गुडगाव येथे एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर तीन जणांनी गोळ्या झाडल्या होत्या त्यांना देखील त्याने ग्रुपमधून काढून टाकले होते. दरम्यान पेशावर येथील घटनेनंतर पीडित व्यक्तीचा भाऊ हुमायूंने दिलेल्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

नेमकं काय झालं?

दरम्यान या प्रकरणात देण्यात आलेल्या तक्रारीनुसार मुश्ताक हा एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमीन होता. त्यांचा अश्फाक याच्याबरोबर ग्रुपमधून काढून टाकल्यावरून वाद झाला होता. हा वाद हुमायूं याच्यासमोरच झाला होता. त्यानंतर हे दोघे भाऊ वाद मिटवण्यासाठी अश्फाकच्या घरी जात होते पण आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर दोघा भावांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. दोघे पेट्रोल पंपाच्या इथे जाऊन लपले देखील, पण अश्फाकने त्यांचा तेथेही पाठलाग केला आणि गोळ्या घालून मुश्ताकची जागेवरच हत्या केली. पोलीसांनी पीडित व्यक्तीचा मृतदेह कुटुंबियांना सोपवला आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान या घटनेमुळे सोशल मीडियावर यासंबंधी चर्चा सुरू झाली आहे.