Husband Killed Wife in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात धक्कादायक घटना घडली आहे. मेरठमध्ये आपल्या १६ वर्षांच्या मुलाची परीक्षा केंद्राबाहेर वाट पाहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ती तिच्या प्रियकराबरोबर येथे थांबली होती. या घटनेत महिलेचा प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी सकाळी बुलंदशहर येथे हा प्रकार घडला. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी सांगितलं की, महिला आणि तिचा प्रियकर सरजित सिंग महिलेच्या १६ वर्षीय मुलाला दहावीच्या परीक्षेसाठी शाळेत सोडायला गेले होते. तिथेच या महिलेचा पती आणि पतीचा भाऊ आला. त्यांनी तिथे लागलीच गोळीबार केला. या घटनेमुळे आजूबाजूच्या लोकांनी पळापळ करत स्वतःचा जीव वाचवला. तर हल्लेखोर तिथून पळून गेले.

हल्ल्यानंतर महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेच्या डोक्यात गोळी शिरली होती. त्यामुळे उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. तर सरजित याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पतीविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी पती नरेश सिंग (४०) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या मुलानेच पोलिसांत तक्रार दाखल केली. नरेश सध्या फरार असून पोलिसांच्या पथकाकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

दाम्प्त्याला दोन मुलं, वर्षभरापासून दोघेही विभक्त

नरेश हा गंघारी गावातील असून १७ वर्षांपूर्वी त्याचं या महिलेबरोबर लग्न झालं होतं. या दोघांना दोन मुलं आहेत. अक्षांशू (१६) आणि मुलगी खुशी अशी त्यांची नावे आहेत. वर्षभरापूर्वी या महिलेने आपल्या पतीला सोडून प्रियकर सरजित याच्याबरोबर संसार थाटला होता. तो नोएडा येथे राहणारा असून तो मुळचा नरेश सिंगच्या गावचाच आहे.

Story img Loader