Crime News : पश्चिम बंगालमध्ये एका तिशीतील महिलेवर पतीने गोळी झाडल्याचे प्रकरण समोर आले आहे. नॉर्थ २४ परगना भागातील नैहाटी येथील एका व्यक्तीने त्याच्या घरातच पत्नीवर गोळ्या झाडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी या दोघांमध्ये जवळच्या एका चित्रपटगृहात बंगाली चित्रपट पाहण्यावरून वाद झाला होता. वाद इतका वाढला की महिला पतीला तिथेच सोडून परत घरी आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रलेखा घोष असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून तिला छाती, पाय आणि हात अशा तीन ठिकाणी गोळ्या लागल्या आहेत. तसेच तिची प्रकृती नाजूक आहे. तिच्यावर बैरकपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्यावर गोळ्या बाहेर काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. महिलेचा पती महेद्र प्रताप घोष हा रिएल इस्टेट एजंट असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याचे पिस्तूल देखील जप्त करण्यात आले आहे. न्यायालयासमोर हजर केले गेले असता त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेहेंद्र प्रताप हा नैहाटीच्या राजेंद्रपूर येथील रहिवासी असून त्याचे लग्न चंद्रलेखा हिच्याशी दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असत.

नेमकं काय झालं?

या जोडप्याच्या शेजार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दोघांमधील भांडणाने टोक गाठलं. महेंद्र प्रताप यांने चंद्रलेखालाकडे नुकताच प्रदर्शित झालेल्या बंगाली चित्रपटाचा संध्याकाळी ४ ते ७ वाजताचा शो पाहण्यासाठी जवळच्या चित्रपटगृहात सोबत येण्याचा आग्रह धरला होता. या चित्रपटात त्याचा आवडता अभिनेता देखील होता. चंद्रलेखाने चित्रपट पाहण्यासाठी जाण्यास सुरुवातीला नकार दिला, ज्यावरून वाद सुरू झाला. पण नंतर ती जाण्यासाठी तयार झाली. पण चित्रपटगृहात देखील त्यांच्यातील वाद सुरूच होता. त्यामुळे चंद्रलेखा इंटरव्हलच्या वेळी जवळपास ६ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडली आणि घरी निघून आली. महेंद्रने चित्रपट पूर्ण पाहिला आणि सव्वा सातच्या सुमारास घरी परतला, त्यानंतर झालेल्या वादानंतर त्याने चंद्रलेखावर आठ वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडल्या, असे एका शेजाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी सांगितलं की दोघांमध्ये झालेल्या वादानंतर गोळीबार करण्यात आला. पण महेंद्र प्रताप याने पोलिसांना सांगितलं की पिस्तूल साफ करताना चुकून गोळी झाडली गेली. “परवानाधारक पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. आम्ही रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्याच्या पत्नीने जबाब नोंदवण्याची वाट पाहत आहोत,” असे बैरकपूर आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man shoots wife over bengali film after she left movie midway marathi crime news rak