गुजरातमधलं एक चकीत करणारं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात पतीने पत्नीचा जीव गेला म्हणून स्वतःविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नर्मदा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेची चर्चा सुरु झाली आहे. कार अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या पतीने पोलीस स्टेशनमध्ये स्वतःविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पत्नीचं अपघाती निधन झाल्याने पतीने स्वतःविरोधात दाखल केला गुन्हा
कार चालवताना श्वानाला कार धडकणार होती, ती कार मी वळवली. ती कार डिव्हायडरला धडकली. या घटनेत पत्नीचं निधन झालं. माझ्या चुकीमुळे पत्नीचं निधन झालं त्यामुळे मी माझ्यावर गुन्हा दाखल करतो आहे असं ५५ वर्षीय परेश दोशीने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसंच या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येतो आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
परेश दोशी हे त्यांच्या पत्नीसह रविवारी सकाळी अंबाजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते.हे दोघे त्यांच्या कारने परतत असताना साबरकांडा भागातल्या खेरोज खेडब्रह्मा राज्य महामार्गावर एक श्वान कारसमोर आला. त्यामुळे परेश दोशी यांचं लक्ष विचलित झालं आणि त्यांनी श्वानाला वाचवण्यासाठी कार वळवली. जी अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला धडकली. कारचं नियंत्रण धडकल्याने कारचा दरवाजा ऑटो लॉक झाला. त्यामुळे दोशी आणि त्यांची पत्नी दोघंही कारमध्येच अडकले.
हे पण वाचा- चंद्रपूर : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने तिघांना चिरडले, अपघातानंतर चालक पसार
कारमध्येच अडकले होते दोघेजण
अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी दोशी दाम्पत्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा उघडला नाही. त्यानंतर काही जणांनी काच फोडून दोशी आणि त्यांच्या पत्नीला बाहेर काढलं असं दोशी यांनी पोलिसांना सांगितलं. रुग्णालयात जेव्हा या दोशी आणि त्यांच्या पत्नीला आणण्यात आलं तेव्हा त्यांच्या पत्नीचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यानंतर आता परेश दोशी यांनी स्वतःविरोधात गुन्हा दाखल केला आहे.