Viral Video : सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक भाषांचा मुद्दा चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटकमध्ये देखील स्थानिक कन्नड भाषेचा आग्रह धरताना पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कन्नड भाष हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. स्थानिक नागरिक आणि स्थलांतरित लोकांमध्ये यावरून वाद झाल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. असा एखादा व्हिडीओ व्हायरल झाला की पुन्हा हा मुद्दा चर्चेत येतो.

दरम्यान कथितपणे बेंगळुरूमधील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून ज्यामध्ये ही भूमिका उलटल्याचे पाहायला मिळत आहे. एक व्यक्ती स्थानिक रिक्षा चालकाला हिंदीत बोलण्यासाठी धमकावताना दिसत आहे. ज्यामध्ये तो आक्रमकपणे तुम्ही कुठेही राहत असलात तरी हिंदीतच बोलावे असे बजावताना पाहायला मिळत आहे. दरम्यान या घटनेमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती संतापलेला दिसत असून तो रिक्षा चालकाला हिंदीत बोलण्यास सांगताना दिसत आहे. “नोएडा में रहो या बंगळुरू में रहो, तुम भी हिंदी में बात करो (तू नोएडात राहा किंवा बेंगळुरूमध्ये, तू देखील हिंदीतच बोल),” असे तो व्यक्ती ऑटोरिक्षा चालकाला म्हणतो. तर त्या व्यक्तीबरोबर असलेली महिला वाद मिटवण्याचा तसेच त्याला दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करते.

तू बंगळुरूला आला आहेस, तू कन्नडामध्ये बोल. मी हिंदीत बोलणार नाही, असं उत्तर ऑटोरिक्षा चालक त्या व्यक्तीला कन्नड भाषेत सांगताना ऐकू येत आहे. या दोघांमध्ये नेमका वाद कशावरून झाला हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. यानंतर ऑटोरिक्षा प्रवाशावर टीका केली जात आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नसल्याचे नमूद केले आहे.

या व्हिडीओला ३० लाख व्हिव्यूज मिळाले आहेत, तसेच या व्हिडीओवर हजारो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.