तमिळनाडूच्या चेन्नईतील एका मेडिकलमध्ये काम करणाऱ्या तरुणाच्या बँक खात्यात तब्बल ७५३ कोटी रुपये जमा झाल्याचं आढळलं आहे. संबंधित तरुणाने आपल्या मित्राला दोन हजार रुपये पाठवले होते. त्यानंतर त्याने बँक खात्यातील उर्वरित रक्कम तपासली. बँकेतील शिल्लक रक्कम पाहून तरुणाला आश्चर्याचा धक्काच बसला. यानंतर संबंधित तरुणानं याबाबतची माहिती बँकेला कळवली. बँकेनं तत्काळ तरुणाचं बँक खातं गोठावलं आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद इद्रिस असं संबंधित तरुणाचं नाव आहे. तो चेन्नईतील एका मेडिकलमध्ये काम करतो. इद्रिस याने शुक्रवारी (६ ऑक्टोबर) आपल्या कोटक महिंद्रा बँक खात्यातून मित्राला २ हजार रुपये ट्रान्सफर केले होते. या व्यवहारानंतर त्याने आपल्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासली. यावेळी त्याच्या खात्यात तब्बल ७५३ कोटी रुपये आढळले.
बँक खात्यात एवढी मोठी रक्कम आढळल्यानंतर त्याने बँकेला याबाबतची माहिती दिली. यानंतर बँकेनं त्याचं बँक खातं गोठावलं. विशेष म्हणजे एवढी मोठी रक्कम एखाद्या सामान्य ग्राहकाच्या खात्यात जमा होण्याची ही तामिळनाडूतील तिसरी घटना आहे.
यापूर्वी चेन्नईतील राजकुमार नावाच्या कॅब चालकाच्या तमिळनाडू मर्कंटाइल बँक खात्यात सुमारे नऊ हजार कोटी रुपये आढळले होते. बँकेला याबाबतची माहिती कळवल्यानंतर बँकेने जास्तीची रक्कम काढून घेतली. तसेच तंजावर येथील गणेशन नावाच्या व्यक्तीबरोबरही असाच प्रकार घडला. त्याच्या बँक खात्यात ७५६ कोटी रुपये आढळले होते.