रेल्वेतील ‘अप्पर बर्थ’ अंगावर कोसळल्याने ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अली खान असं या ६२ वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे. १६ जून रोजी केरळहून दिल्लीला जाताना ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – जबाबदारीला वय नसतं! एकीकडे शिक्षणाची भूक, तर दुसरीकडे पोटाची भूक; चिमुकल्याचा VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अली खान हे मुळचे केरळच्या मल्लापूरम येथील रहिवासी होते. तसेच ते एलआयसी एजंट म्हणून काम करत होते. ते त्यांच्या मित्रासह जालंधरला जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी १५ जून रोजी रात्री एर्नाकुलम-हजरत निझामुद्दीन एक्सप्रेसने प्रवास सुरू केला. ते खालच्या बर्थवर झोपले होते. १६ जून रोजी एक्सप्रेस गाडी तेलंगणातून जात असताना अचानक अप्पर बर्थ त्यांच्या अंगावर येऊन कोसळला.
या घटनेनंतर प्रवाशांनी तत्काळ याची माहिती गाडीतील टीटीईला दिली. त्यांनी अलीखान यांना वारंगल येथील रुग्णालयात दाखल केले. वारंगल येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अलीखान यांना हैदराबादच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, एक उचारादरम्यान २४ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला.
यासंदर्भात बोलताना अलीखान यांचे लहान भाऊ बकर म्हणाले, अलीखान हे त्यांच्या मित्रासह जालंधरला जाण्यासाठी निघाले होते. तिथे त्यांच्या मित्राच्या मुलीच्या महाविद्यालयात कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांनी अलीखान यांना बरोबर येण्याची विनंती केली होती. जालंधरला जाण्यापूर्वी दिल्ली आणि आग्रा येथे फिरून मग पंजाबच्या दिशेने निघावं, असं त्यांनी ठरवलं होतं. मात्र, त्यापूर्वीच तेलंगणात असताना त्यांच्या अंगावर रेल्वेचा अप्पर बर्थ कोसळल्याची घटना घडली. याबाबत आम्हाला त्यांच्या मित्राने माहिती दिली.
दरम्यान, याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचेही बकर यांनी सांगितलं.