उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी कमी झाली आहे, असे दावे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेहमी करत असतात. मात्र मंगळवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे एक धक्कादायक प्रकार घडला. एका युवकाने थेट केंद्रीय राज्यमंत्र्यांची गाडी सुरक्षा कर्मचाऱ्यांदेखत पळवून नेण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती या त्यांच्या खासगी वाहनात बसल्याचे समजून त्यांच्या वाहनाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. लखनऊच्या बंथरा पोलिस ठाण्यात याबद्दल आता गुन्हा दाखल झाला आहे. चालकाच्या तक्रारीनुसार, निरंजन ज्योती यांना विमानतळावर घेण्यासाठी त्यांचा ताफा जात होता. यावेळी प्रचंड धुकं असल्यामुळे ताफा विमानतळाच्या अलीकडे प्रधान नामक ढाब्यावर थांबला होता. यावेळी तिथे एका व्यक्तीने गाडीत घुसून ती पळविण्याचा प्रयत्न केला.
मंत्र्यांच्या गाडीचे चालक चेताराम हे कानपूरच्या मूसानगर भागात राहतात. त्यांनी तक्रारीत म्हटले की, आम्ही मंगळवारी केंद्रीय मंत्र्यांना आणण्यासाठी विमानतळावर जात होतो. सुरक्षा कर्मचाऱ्यांना चहा प्यायचा होता, तसेच प्रचंड धुकं असल्यामुळे आम्ही बंथरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या प्रधान ढाब्यावर थांबलो. यावेळी एक युवक अचानक मंत्र्यांच्या गाडीत घुसला आणि त्याने गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत गाडीला घेरले आणि पळून जाणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले.
मंत्री गाडीत आहे, असे समजून अपहरणाचा प्रयत्न
तक्रारीत पुढे म्हटले की, मंत्र्यांची खासगी गाडी आणि सुरक्षा कर्मचारी असल्याचे पाहून आरोपीला वाटले की, मंत्री गाडीतच आहेत. त्यामुळे त्याने गाडीचे अपहरण करण्याचा विचार केला. आरोपीने अचानक गाडीत घुसून गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्याचा प्रयत्न फसला. बंथरा पोलिस ठाण्याचे प्रभारी हेमंत राघव यांनी सांगितले की, चालकाच्या तक्रारीवरून आम्ही सदर आरोपी युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक चौकशी केली असता त्या युवकाचे मानसिक संतुलन ठिक नसल्याचे कळते आहे. मात्र घटनेचे गांभीर्य पाहून प्रत्येक पैलूची कसून चौकशी करण्यात येत आहे.
कोण आहेत साध्वी निरंजन ज्योती?
५२ वर्षीय साध्वी निरंजन ज्योती या २०१४ साली पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या फतेहपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. त्याआधी २०१२ सालीही त्यांनी फतेहपर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला होता. उमा भारती यांच्यानंतर निवडून येणाऱ्या त्या दुसऱ्या साध्वी आहेत. पहिल्या टर्ममध्येही त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर २०१९ साली त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले. निरंजन ज्योती यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या हमीरपुर जिल्ह्यातील पटेवरा गावात १९६७ साली झाला होता. त्या निषाद या मागासवर्गीय समाजातून येतात.
दिल्लीत एका निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत असताना साध्वी निरंजन ज्योती यांनी भाजपामधील कार्यकर्त्यांसाठी रामजादे आणि विरोधी पक्षातील लोकांसाठी हरामजादे असा शब्दप्रयोग केला होता. या शब्दप्रयोगानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात आली. त्यानंतर त्यांनी संसदेतील दोन्ही सभागृहात या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली.