Man Urinated At Delhi Airport : एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद व्यक्तीने महिलेवर लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच आता एका प्रवाशाने दिल्ली विमानतळावर उघड्यावर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ८ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच्या सुमारास ही घटना घडली. जौहर अली खान, असे या व्यक्तीने नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने मद्यधुंद अवस्थेत हे कृत्य केलं असल्याची माहिती आहे.
हेही वाचा – बंगळूरुतील ५५ प्रवाशांना न घेताच विमान दिल्लीकडे; ‘गो-फस्र्ट’ला नोटीस
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जौहर अली खान हा ८ जानेवारी रोजी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास सौदी अरेबिया जाण्यासाठी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला होता. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने गेट क्रमांक ६ जवळ पोहोचताच उघड्यावर लघुशंका करण्यास सुरूवात केली. यावेळी इतर प्रवाशांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी वाद घालण्यास सुरूवात केली. प्रवाशांनी याची माहिती तत्काळ सीआयएसएफला दिली. सीआयएसएफने घटनास्थळी दाखल होत, आरोपीला पकडून दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. दिल्ली पोलिसांनी जौहरची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला न्यायालयात सादर करण्यात आले. मात्र, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
हेही वाचा – मोठी बातमी! मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; गुजरातमध्ये इमर्जन्सी लँडिंग
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाने महिलेवर लघुशंका केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बंगळुरूमधून अटक केली होती. तसेच न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.