गेल्या काही दिवसांत विमानातून प्रवास करताना सहप्रवाशावर लघुशंका केल्याच्या काही घटना समोर आल्या आहे. एका भारतीय प्रवाशाने दारुच्या नशेत एका महिला प्रवाशावर लघुशंका केल्याची घटना ताजी असताना, आता अन्य एका भारतीय प्रवाशाने सहप्रवाशाच्या अंगावर लघुशंका केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे.
‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना रविवारी रात्री नऊ वाजता न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला येणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात घडली. एका भारतीय व्यक्तीने विमानात वाद घालत असताना दारूच्या नशेत एका प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली. हा प्रकार घडल्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी सहप्रवाशांचे नोंदवले असून आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिलं. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती, DGCA ने दिली.
एअरलाइन्सच्या कर्मचार्यांनी आरोपी प्रवाशाबद्दल तक्रार दिल्यानंतर नागरी विमान वाहतूक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेबाबत सहप्रवाशांकडून कोणताही पुरावा सादर केला नाही किंवा तक्रार दिली नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
ही घटना अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक- एए २९२ मध्ये घडली. रविवारी रात्री नऊच्या सुमारास विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर उतरल्यानंतर CISF ने बेजबाबदार प्रवाशाला अटक केली.