Bengaluru Blast Updates : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वर कॅफेमध्ये शुक्रवारी (१ मार्च) बॉम्बस्फोट झाला होता. आरोपीने कॅफेमध्ये स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवण्यात आली होती. या स्फोटामुळे १० लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. आता स्फोटाच्या दुसऱ्या दिवशी संशयित आरोपीचे छायाचित्र समोर आले आहे. पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही चित्रणामध्ये टोपी आणि मास्क घातलेला एक व्यक्ती हातात आयईडी स्फोटकांनी भरलेली बॅग घेऊन कॅफेमध्ये येताना दिसत आहे. त्यानंतर त्याने कॅफेत रवा इडलीची ऑर्डर दिली आणि तिथेच बॅग ठेवून तो निघून गेला.
बंगळुरुच्या व्हाइटफिल्ड परिसरात स्थित असलेला रामेश्वर कॅफे शहरात लोकप्रिय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने कॅफेमध्ये बॅग सोडली. नाश्ता केल्यानंतर तो बॅग तिथेच सोडून निघून गेला. त्यानंतर बॉम्बस्फोट झाला. संशयित आरोपीसह असलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आले आहे. बंगळुरू पोलीस त्याची चौकशी करत आहे.
सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये काय दिसले?
संशयित आरोपीने मास्कने आपला चेहरा झाकलेला असल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसत आहे. तसेच त्याने चष्मा घातलेला असून डोक्यावर टोपी आहे. कॅफेत आल्यानंतर त्याने रवा इडलीची ऑर्डर दिली, आपली ऑर्डर घेऊन जातानाही तो दिसत आहे. शुक्रवारी दुपारी १२.५० ते १ वाजण्याच्या सुमारास हा बॉम्बस्फोट झाल्याचे कळते. या दुर्घटनेत १० लोक जखमी झाले आहेत. न्यायवैद्यकशास्त्र आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी पुरावे शोधण्याचे काम करत आहे.
या स्फोटानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. चेहरा ओळख प्रणालीद्वारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आरोपीचे वय २५-३० असल्याचे सांगितले जाते. वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी एका बसमधून कॅफेजवळ उतरल्याचे दिसत आहे. कॅफेमध्ये इडली विकत घेण्यासाठी त्याने रोकड दिली होती. इडली खाल्ल्यानंतर तिथेच आपली बॅग सोडून जाताना तो दिसत आहे. कॅफेमध्ये त्याने सात मिनिटं घालवली.